मुंबई : घाटकोपर दुर्घटनेमागचे तांत्रिक कारण शोधण्यासाठी मुंबई महापालिका प्रशासनाने व्हीजेटीआयची मदत घेण्याचे ठरवले आहे. त्याकरीता पालिका प्रशासनाने संस्थेच्या संरचनात्मक अभियांत्रिकी (स्ट्रक्चरल इंजिनिअरींग) विभागाच्या प्रमुखांना पत्र पाठविल्याची माहिती मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिली.
घाटकोपर येथे महाकाय जाहिरात फलक कोसळून १४ जणांचा मृत्यू झाला. अशा दुर्घटनेची भविष्यात पुनरावृत्ती होवू नये यासाठी काळजी घेण्यात येणार आहे. या दुर्घटनेमागचे तांत्रिक कारण शोधण्यासाठी अभ्यास करण्यात येणार आहे. या प्रकरणी अभ्यास करून लवकरात लवकर अहवाल सादर करावा, असे पत्र उपायुक्त (विशेष) किरण दिघावकर यांनी संरचनात्मक अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख केशव सांगळे यांना पाठवले आहे. या कामासाठी व्हीजेटीआयच्या तज्ज्ञांना मानधनही दिले जाणार आहे.