दहीहंडी उत्सवात मुली पळवून आणण्याचे वादग्रस्त वक्तव्य करणारे घाटकोपर येथील भाजपा आमदार राम कदम पुन्हा एकदा नव्या वादात सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यांनी वयाची १८ वर्ष पूर्ण झालेल्या नव मतदारांना मतदार यादीत नाव नोंदवण्यासाठी लालूच दाखवली आहे.
सक्षम #मतदार, सक्षम लोकशाही,
जबाबदारी तुमची, जबाबदारी आमची,
नवमतदारांनो, #लोकशाहीला सक्षम बावनवण्यासाठी आजच आपले नाव मतदार यादीत नोंदवा आणि आमच्यासोबत तिरुपती #बालाजी यात्रेला चला.#ElectionCommission #PMOIndia pic.twitter.com/ADI6XGCdaw— Ram Kadam (@ramkadam) October 13, 2018
२००९ साली मी पहिल्यांदा आमदार झालो. त्यावेळी जी मुले चौथी-पाचवीत होती. ती आता १८ वर्षांची झाली आहेत. त्या सर्वांनी मतदार यादीत नाव नोंदणी करावी. तुम्ही मतदार यादीत नाव नोंदवल्यास तुम्हाला हमर, बेन्टली या महागडया गाडयांमधून फिरवून आणीन. शाहरुख खान, सलमान खान, वरुण धवन, रणवीर सिंह या अभिनेत्यांबरोबर तुमची भेट घडवून आणीन तसेच तुम्हाला तिरुपती बालाजी यात्रेला घेऊन जाईन अशी आमिष राम कदम यांनी दाखवली आहेत.
भाजपा आमदार राम कदम यांचा नवीन प्रताप..
तुम्ही नवीन मतदार नोदणी करा व माझ्या कार्यालयाला कळवा…तिरूपती यात्रा , लोकप्रिय अभिनेत्यांसोबत फोटो काढून देणार , महागड्या गाड्या मध्ये फिरवणार …आमिष मतदारांना मतदार होण्यासाठी मग निवडुन येण्यासाठी.. pic.twitter.com/Yu4WsGvE8d
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) October 13, 2018
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी लगेचच भाजपा आमदार राम कदम यांचा नवीन प्रताप या नावाने हा व्हिडिओ शेअर केला आहे. मतदार होण्यासाठी मतदारांना आमिष दाखवताय मग निवडुन येण्यासाठी काय ? असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी विचारला आहे.