मुंबई : घाटकोपर येथील महाकाय फलक दुर्घटना प्रकरणातील प्रमुख आरोपी आणि व्यावसायिक अर्शद खान याला सत्र न्यायालयाने गुरुवारी जामीन मंजूर केला. याआधीही अर्शद याने सत्र न्यायालयात जामीनासाठी अर्ज केला होता. परंतु, त्याचा अर्ज फेटाळून लावण्यात आला होता. त्यानंतर त्याने पुन्हा जामिनासाठी अर्ज केला. तसेच, प्रकरणातील इतर मुख्य आरोपींना आधीच जामीन मंजूर करण्यात आला आहे. गुन्ह्यात त्यांचा सहभाग असल्याचे सिद्ध करण्यासाठी पुरेसे पुरावे असल्याचे सरकारी वकिलांनी सांगूनही त्यांना जामीन मंजूर झाला होता. त्यामुळे, आपल्यालाही समानतेची वागणूक मिळालायला हवी, असा दावा करून अर्शद याने जामिनाची मागणी केली होती. न्यायालयाने त्याची ही मागणी मान्य करून त्याला जामीन मंजूर केला.
आरोप काय?
तत्पूर्वी, दुर्घटनाग्रस्त महाकाय फलकासाठी अर्शद याने परवानगी मिळवल्याचा आरोप होता. परंतु, रेल्वे अथवा महापालिकेने केलेल्या तक्रारीत अर्शद याला आरोपी करण्यात आले नव्हते. त्यामुळे, आपल्या अशिलाला याप्रकरणी विनाकारण अडकवण्यात आले आहे, असा दावा अर्शद याच्या वतीने युक्तिवाद करताना वकील सना रईस खान यांनी केला. फलक लावण्यासाठी लागणाऱ्या आवश्यक परवानग्या मिळवण्यासाठी अर्शद याने पोलिस आयुक्तांशी संगनमत केल्याचा मुख्य आरोप देखील त्याच्यावर होता. मात्र, तपास यंत्रणेने या गुन्ह्यात कोणत्याही आयुक्तांना आरोपी केलेले नाही. यावरूनच तपास निराधार आणि पक्षपाती असल्याचे देखील खान यांनी युक्तिवाद करताना न्यायालयाला सांगितले.
अर्शद याने प्रकरणातील मुख्य आरोपी भावेश भिंडे याच्या मालकीच्या इगो मीडिया कंपनीच्या नावे एकूण एक कोटी रुपयांचे विविध रकमेचे धनादेश दिल्याच्या आणि नंतर ती रक्कम काढल्याच्या आरोपही त्याच्यावर असला तरी तोही बिनबुडाचा असल्याचा दावा वकील खान यांनी सुनावणीच्या वेळी केला. त्यांचा युक्तिवाद ग्राह्य मानून न्यायालयाने अर्शद खानला जामीन मंजूर केला.
प्रकरण काय?
गेल्यावर्षी मे महिन्यात मुंबईत वादळी वारे आणि मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. त्यावेळी घाटकोपर येथील पेट्रोल पंपजावळ असलेले सुमारे १०० फुटांचं महाकाय फलक पेट्रोलपंपावर कोसळले आणि त्यात १७ जणांचा मृत्यू झाला, तर ७० जण जखमी झाले. दुर्घटनेनंतर काही दिवसांनी भावेश भिंडे याला राजस्थानमधील उदयपूर येथून अटक केली होती. याशिवाय अन्य आरोपींनाही अटक करण्यात आली. सगळ्यात शेवटी अर्शद याला अटक करण्यात आली होती. दरम्यानच्या काळात, भावेश भिंडेसह अन्य आरोपींना सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला. त्यामुळे, आपल्यालाही जामीन मंजूर करण्याची मागणी भिंडे याने केली होती.