मुंबईः घाटकोपरमधील पेट्रोल पंपावर महाकाय फलक कोसळून १७ जणांचा मृत्यू झाल्याप्रकरणी गुन्हे शाखेने व्यावसायिक अरशद खानला अटक केली. आरोपीला लखनऊ येथून अटक करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली. फलक प्रकरणातील आर्थिक व्यवहारांबाबतची माहिती उघड होण्याच्या दृष्टीने खानची अटक महत्त्वपूर्ण मानली जाते.
याप्रकरणात इगो मीडिया कंपनीचा संचालक भावेश भिंडे, इगो मीडिया कंपनीची माजी संचालक जान्हवी मराठे, जाहिरात फलकाच्या देखरेखीची जबाबदारी असलेला सागर पाटील व मान्यताप्राप्त स्थापत्य अभियंता मनोज संघू यांना अटक केली होती. त्या चौघांविरोधात ऑक्टोबर आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. तपासात २०२१ व २०२२ मध्ये ईगो मीडियाने ३९ विविध व्यवहारांमध्ये १० बँक खात्यांमध्ये ४६ लाख ५० हजार पाठवण्यात आले होते. ती रक्कम अरशद खानला मिळाल्याचा आरोप आहे. त्याप्रकरणी गुन्हे शाखेने अरशद खानला समन्स बजावले होते. पण त्याने याप्रकरणी न्यायालयात धाव घेतली. त्यानंतर तो बेपत्ता झाला होता. गुन्हे शाखा त्याचा शोध घेत होती.
हेही वाचा >>> वांद्रे, निर्मलनगरमध्ये म्हाडाची ३० घरे; संक्रमण शिबिराच्या पुनर्विकासाअंतर्गत ११० संक्रमण शिबिराचे गाळेही उपलब्ध होणार
अखेर खानला उत्तर प्रदेशातील लखनऊ येथून अटक करण्यात आली. आरोपी भागिदार असलेल्या कंपन्यांबाबतची माहिती गुन्हे शाखेला मिळाली असून त्या दृष्टीनेही तपास सुरू आहे. याप्रकरणी भादंवि कलम ३०४ (सदोष मनुष्यवध), ३३८ (गंभीर दुखापत), ३३७ (निष्काळजी कृत्यामुळे दुखापत करणे) व ३४ (सामान्य हेतू) अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. आता त्याचा तपास गुन्हे शाखेचे विशेष तपास पथक करीत आहे. त्यांनी याप्रकरणी आतापर्यंत १०२ जणांचे जबाब नोंदवले आहेत. त्यात दोन महापालिका कर्मचारी, लोहमार्ग पोलीस दलाचे आजी व माजी अधिकारी, कर्मचारी असे मिळून सहा जण, कच्चामाल पुरवणाऱ्या ५ व्यक्तींच्या जबाबाचा समावेश आहे.
हेही वाचा >>> मुंबई : रे रोडमध्ये जलवाहिनी फुटली, शिवडी परिसरातील पाणीपुरवठ्यावर परिणाम
याशिवाय या दुर्घटनेत जखमी झालेल्या व्यक्ती व त्यांचे नातेवाईक अशा ९० जणांचे जबाबही नोंदवण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. या ३२९९ पानांच्या आरोपपत्रामध्ये निलंबित अधिकारी कैसर खालिद यांच्यासह भारतीय पोलीस सेवेतील (भापोसे) दोन अधिकाऱ्यांच्या जबाबाचाही समावेश असल्याची माहिती सूत्रांनी दिली. यापूर्वी दादर येथील जाहिरात फलकाच्या परवानगीशी संबंधित असल्यामुळे आपण घाटकोपर जाहिरात फलकाला परवानगी दिल्याचे त्यांनी सांगितले. तसेच पोलीस कल्याणाच्या दृष्टीने सर्व केल्याचे म्हटल्याचे सूत्रांनी सांगितले.