मुंबईः घाटकोपरमधील पेट्रोल पंपावर जाहिरातीचा महाकाय फलक कोसळून झालेल्या दुर्घटनेप्रकरणी विशेष तपास पथकाने इगो मीडिया कंपनीची माजी संचालक जान्हवी मराठेसह तिचा साथीदार सागर पाटील याला गोव्यावरून अटक केली. जाहिरात फलक देखरेख करण्याचे काम पाटील करीत होता. दोघेही गेल्या काही दिवसांपासून गोव्यातील एका हॉटेलमध्ये वास्तव्याला होते. जाहिरात फलक कोसळल्यापासून मराठे बेपत्ता होती आणि तिचा अटकपूर्व जामीन अर्जही फेटाळण्यात आला होता. घाटकोपर येथील पेट्रोल पंपावर १३ मे रोजी जाहिरात फलक कोसळून १७ जणांचा मृत्यू झाला होता.
मराठे आणि पाटील यांना गोव्यातील एका हॉटेलमधून अटक करण्यात आली. त्यांना विमानाने मुंबई आणण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली. त्यांचे मोबाइल बंद होते. त्यामुळे गेल्या काही आठवड्यांपासून पोलीस त्यांच्या शोधात होते. मराठे नोव्हेंबर २०२३ पर्यंत कंपनीची संचालक होती. त्यानंतर या प्रकरणातील अटक आरोपी भावेश भिंडे संचालक झाला. यापूर्वी काळ्या यादीत टाकण्यात आल्याने भिंडे यांनी मराठेच्या नावावर कंपनीची नोंदणी केल्याचे पोलिसांनी सांगितले. पण दोघांमध्ये वाद झाल्यामुळे डिसेंबर २०२३ मध्ये भिंडे पुन्हा कंपनीचा संचालक झाला.
हेही वाचा : केईएम रुग्णालयातील तंबाखू बंद क्लिनिक अद्ययावत होणार
आरोपी त्यांचा मोबाइल बंद ठेवत होते. दूरध्वनी करण्यासाठी १२ किलोमीटर दूरचा प्रवास करीत होते. त्यानंतर पुन्हा दूरध्वनी बंद करीत होते. त्यामुळे त्यांचा शोध घेणे कठीण झाले होते. त्यांच्या शोधासाठी आणखी दोन पथके गोव्यात पाठवण्यात आली होती. मराठे आणि पाटील या दोघांना शनिवारी संध्याकाळी अटक करण्यात आली. त्यानंतर रविवारी त्यांना सुटीकालीन न्यायालयीपुढे हजर करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. या प्रकरणातील एकूण अटक आरोपींची संख्या आता चार झाली आहे. यापूर्वी अटक केलेल्या दोघांमध्ये इगो मीडिया कंपनीचे सध्याचे मालक भावेश भिंडे आणि जाहिरात फलकासाठी सुरक्षा प्रमाणपत्र देणारा अभियंता मनोज संघू यांचा समावेश आहे. दोन्ही आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.
हेही वाचा : २६३ कोटी रुपयांचा प्राप्तिकर गैरव्यवहार, मालमत्तांची कागदपत्रे बनावट असल्याचे ईडी तपासात निष्पन्न
दुर्घटनाग्रस्त जाहिरात फलक उभारण्याबाबत रेल्वे पोलिसांकडून इगो मीडिया कंपनीला परवानगी मिळाली, त्यावेळी मराठे कंपनीची संचालक होती. तर या बांधकामावर देखरेख करण्याचे काम पाटीलचे होते. व्हीजेटीआय येथील तज्ज्ञांनी दुर्घटनाग्रस्त जाहिरात फलकाची पाहणी करून विशेष तपास पथकाला अहवाल सादर केला होता. त्यात जाहिरात फलकाचा पाय भक्कम नसल्याचे नमुद करण्यात आले होते. घाटकोपर दुर्घटनेप्रकरणी पंतनगर पोलिसांनी भादंवि कलम ३०४ (सदोष मनुष्यवध), ३३८ (गंभीर दुखापत), ३३७ (निष्काळजी कृत्यामुळे दुखापत करणे) व ३४ (सामान्य हेतू) अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. आता याप्रकरणाचा तपास गुन्हे शाखेचे विशेष तपास पथक करीत आहे.