मुंबई : गेल्या वर्षी मे महिन्यात घाटकोपर येथील महाकाय फलक दुर्घटनेप्रकरणी अटकेत असलेला प्रमुख आरोपी आणि व्यावसायिक अर्शद खान याला सत्र न्यायालयाने बुधवारी जामीन नाकारला. खान हा सात महिन्यांपासून फरारी होता आणि डिसेंबर अखेरीस लखनऊ येथून त्याला अटक करण्यात आली होती. अतिरिक्त सत्र न्यायाधीश सचिन पवार यांनी खान याचा जामीन अर्ज फेटाळून लावला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मूळ तक्रारीत आपले नाव नसतानाही राजकीय दवाबापोटी या प्रकरणात आपल्याला गोवण्यात आले, असा दावा खान याने जामिनाची मागणी करताना केला होता. महाकाय फलक उभारणाऱ्या इगो मीडिया प्रायव्हेट लिमिटेड किंवा फलकासाठी परवानगी देणाऱ्या सरकारी यंत्रणेशी आपला कोणताही संबंध नाही. तसेच, या फलकासाठी आवश्यक परवानग्या मिळवण्याकरिता आपण पोलीस आयुक्तांशी संगनमत केल्याचा आरोप आपल्यावर ठेवण्यात आला आहे. परंतु, तपास यंत्रणेने या गुन्ह्यात संबंधित अधिकाऱ्याला आरोपी केलेले नाही. त्यामुळे, प्रकरणाचा तपास पक्षपाती असल्याचा दावा खान याने अर्जात केला होता.

इगो मीडियाने मिळवलेल्या कोणत्याही रकमेचे किंवा नफ्याचे आपण लाभार्थी नाही. त्याचप्रमाणे, या प्रकरणातील इतर मुख्य आरोपींना आधीच जामीन मंजूर करण्यात आल्याचेही खान याच्यातर्फे जामिनाची मागणी करताना न्यायालयाला सांगण्यात आले होते. गुन्ह्यात त्यांचा सहभाग असल्याचे सिद्ध करण्यासाठी पुरेसे पुरावे असल्याचे सरकारी वकिलांनी सांगूनही त्यांना जामीन मंजूर झाला होता. त्यामुळे आपल्यालाही समानतेची वागणूक मिळाली पाहिजे, असा दावा खान याने केला होता.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ghatkopar hoarding collapse court rejects bail plea of main accused mumbai print news zws