लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई: रात्रीच्या वेळी औषधाच्या दुकानातून औषध घेऊन परतणाऱ्या एका तृतीयपंथीला मारहाण करून, मद्य पाजून अत्याचार केल्याची घटना घाटकोपर परिसरात घडली. याबाबत पार्कसाईट पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
विक्रोळीच्या पार्क साईट परिसरात पीडित तृतीयपंथी कुटुंबासोबत राहत असून घाटकोपर परिसरातील एका औषधाच्या दुकानात तो रविवारी मध्यरात्री ३ च्या सुमारास औषध घेण्यासाठी एका सहकाऱ्यासोबत गेला होता. दोघेही औषध घेऊन घरी परतत असताना त्यांना घाटकोपरमदील श्रेयस सिनेमा परिसरात मद्य प्राशन केलेल्या दोघांनी अडवले. यावेळी पीडित तृतीयपंथीच्या सहकाऱ्याने घटनास्थळावरून पोबारा केला. मात्र एका आरोपीने पीडित तृतीयपंथीला पकडून जबरदस्ती मद्य पाजले. त्यानंतर काचेच्या बाटलीने त्याच्या हातावर वार करून त्याच्यावर अत्याचार केले. त्यानंतर आरोपीने घटनास्थळावरून पोबारा केला.
पीडित तृतीयपंथीने ही बाब फोन करून त्याच्या कुटुंबियांना दिली. त्याच्या कुटुंबीयांनी घटनास्थळी जाऊन जखमी तृतीयपंथीला घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात दाखल केले. घटनेची माहिती मिळताच पार्कसाईट पोलिसांनी रुग्णालयात जाऊन तृतीयपंथीची भेट घेतली. त्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी कृष्णा नावाच्या इसमाविरोधात गुन्हा दाखल केला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.