पंजाबमधील घुमान येथे होत असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी राज्य सरकारतर्फे दिले जाणारे २५ लाख रुपये अनुदान यंदाही देण्यात येईल. त्यात कोणताही बदल होणार नसल्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांनी ‘लोकसत्ता’ ला सांगितले.
या संमेलनावर प्रकाशकांनी बहिष्कार टाकला असून राज्यातील मराठी साहित्य रसिकही तेथे मोठय़ा संख्येने उपस्थित राहण्याची शक्यता कमी आहे. राज्यात साहित्य संमेलनासाठी हजारो रसिकांची उपस्थिती लाभते. त्यामुळे या महोत्सवातील खर्चाचा वाटा उचलण्यासाठी राज्य सरकार २५ लाख रुपयांचे अनुदान देते. या संमेलनास फारशी गर्दी होण्याची व राज्यातील जनता सहभागी होण्याची शक्यता कमी असल्याने राज्य सरकार हे अनुदान देणार की त्यात कपात करणार, अशी चर्चा सुरु होती. अनुदानाच्या निर्णयात कोणताही बदल करणार नसल्याचे तावडे यांनी स्पष्ट केले.