येत्या एप्रिलमध्ये पंजाबमधील घुमान येथे होत असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने एक ‘अर्थपूर्ण’ योगायोग जुळून आला आहे. संयोजन समितीचे मार्गदर्शक म्हणून केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी या संमेलनाच्या निमित्ताने आपले ‘मराठी’ वजन वाढवण्याचा प्रयत्न करत असतानाच संमेलनासाठी राज्यातील लेखकूंना घेऊन जाणाऱ्या विमानांचा खर्च संमेलनाचे स्वागताध्यक्ष व पुण्यातील टोल कंत्राटदार भारत देसडला हे करत आहेत. त्यामुळे राज्यातील जनता टोलमुक्तीकडे डोळे लावून बसली असताना केंद्रीय वाहतूकमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली ‘टोलशक्ती’च्या रस्त्यावरून साहित्यिकांची घुमानवारी घडणार आहे.
साहित्य संमेलन आणि राजकारण हा कायम चर्चेचा आणि वादाचा विषय राहिला आहे. यंदाच्या संमेलनातही तसेच चित्र आहे. दूरच्या व मराठी भाषिक नसलेल्या पंजाबात होणाऱ्या या संमेलनाच्या संयोजन समितीचे मार्गदर्शक म्हणून केंद्रीय भूपृष्ठ नितीन गडकरी यांची निवड करण्यात आली आहे. संमेलनाच्या यशाची जबाबदारी पुण्यातील सरहद संस्थेचे संजय नहार व येथील सांस्कृतिक व राजकीय वर्तुळात सक्रिय असलेले गिरीश गांधी यांनी उचलली आहे. तर पुण्यातील बडे बांधकाम व्यावसायिक आणि पंजाब, हरयाणा तसेच हिमाचल प्रदेश या राज्यांत टोल कंत्राटदार म्हणून ओळखले जाणारे भारत देसडला या संमेलनाचे स्वागताध्यक्ष आहेत. विशेष म्हणजे, संमेलनाला जाणाऱ्या साहित्यिकांच्या घुमानवारीचा खर्चही देसडला यांनीच उचलला आहे.
या संमेलनासाठी मुंबईहून एक, पुण्याहून दोन आणि नागपुरातून एक अशी विमाने उड्डाण करणार आहेत. विमानवारी स्वस्त दरात व्हावी म्हणून संयोजन समितीने इंडिगो तसेच गो एअरशी बोलणे सुरू आहे. पण तूर्तास स्वागताध्यक्ष असलेले देसडला हेच सध्या घुमानवारीचा खर्च करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. देसडला यांचा उत्साह आणि संमेलनाला लाभलेले केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्र्यांचे ‘मार्गदर्शन’ यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
मराठी भाषेचे संमेलन पंजाबात यशस्वी करून दिल्लीत आपले वजन वाढवण्याचा गडकरी यांचा प्रयत्न आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात सामील होऊन थेट संरक्षणमंत्रीपद मिळवणाऱ्या मनोहर पर्रिकरांमुळे गडकरी समर्थकांच्या वर्तुळात सध्या चिंतेचे वातावरण आहे. त्यामुळे या संमेलनाच्या माध्यमातून केंद्रीय पातळीवर वावरणारा एकमेव मराठी वजनदार नेता, अशी गडकरींची प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे.  

घुमान येथील साहित्य संमेलनासाठी साधारणपणे दीड कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. त्याच्या नियोजनासाठी ‘सरहद’ संस्थेचे संजय नहार यांच्यासमवेत आठवडय़ाभरात निर्णय घेतला जाईल. काही मित्रमंडळींनी आर्थिक मदतीचे आश्वासन दिले आहे. महाराष्ट्राचे हे संमेलन असल्याने मराठी माणूस संमेलनासाठी निधी कमी पडू देणार नाही याची खात्री आहे. सध्या तरी दीड लाख रुपये खर्च झाला आहे. मात्र, निधी कमी पडला तर मी स्वत: तजवीज करून हे संमेलन यशस्वी करेन.
भारत देसडला (स्वागताध्यक्ष)

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी राज्य सरकारकडून २५ लाख रुपयांचे अनुदान मिळेल. त्याखेरीज निधी संकलनासाठी मित्रांचे आर्थिक सहकार्य घेतले जाणार आहे. कोणी निधी देऊ केला तर नाकारायचे नाही, पण पैशांसाठी कोणाकडे हात पसरायचे नाहीत, असे आम्ही ठरविले आहे. संमेलन खर्चातून निधी शिल्लक राहिला तर, घुमान
गावाच्या विकासासाठी आणि मराठी भाषेसाठी काही करण्याचा मानस आहे. सध्या तरी भारत देसडला यांनी व्यक्तिगतरीत्या खर्च केला आहे.
– संजय नहार, संमेलन संयोजक

Story img Loader