घुमान येथे होणाऱ्या ८८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या तयारीची लगीनघाई सुरू झाली आहे. पंजाब राज्य शासनाचे २० विभाग, या विभागांचे सचिव, त्या त्या विभागांचे प्रमुख अधिकारी आणि कर्मचारी असा संपूर्ण चमू या साहित्य संमेलनाच्या तयारीला लागला आहे. हे साहित्य संमेलन पंजाब राज्याने आपल्या ‘राज्याचा कार्यक्रम’ म्हणून घोषित केला आहे. संमेलन आयोजनात कोणतीही कमतरता राहू नये म्हणून राज्य शासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे, अशी माहिती पंजाब राज्य शासनातील विशेष सचिव (गृहनिर्माण व नगरविकास विभाग) डॉ. विजय झाडे यांनी पंजाब येथून खास ‘लोकसत्ता’ला दिली.
डॉ. झाडे हे भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी असून गेल्या १३ वर्षांपासून पंजाब राज्य शासनाच्या सेवेत काम करत आहेत. पंजाब शासनातील ते एकमात्र मराठी अधिकारी असल्याने या साहित्य संमेलनासाठी पंजाब राज्य शासनातर्फे ‘समन्वयक अधिकारी’ अशी जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
साहित्य संमेलन चार दिवसांवर येऊन ठेपले असून संमेलन तयारी, नियोजन आणि एकूणच व्यवस्थेचा रोजच्या रोज आढावा घेण्यात येत आहे. पंजाब राज्य शासनाचे अतिरिक्त मुख्य सचिव सुरेशकुमार यांनी शनिवारी संमेलनाच्या तयारीच्या कामाचा आढावा घेतला.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हा आता पंजाब राज्य शासनाचा इव्हेंट झाला असल्याने राज्य शासनाच्या सर्व विभागांच्या एकत्रीकरणातून संमेलनाची तयारी सुरू आहे. त्यासाठी राज्य शासनाच्या पातळीवर वेगवेगळ्या समित्या तयार करण्यात आल्या असल्याचे सांगून डॉ. झाडे म्हणाले, घुमान येथील सर्व व्यवस्थांची तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे.
उद्घाटन सोहळ्याला पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह उत्तर प्रदेश आणि सिक्कीम राज्याचे राज्यपाल तर समारोपाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. संमेलनाच्या उद्घाटन व समारोप सोहळ्याला १० ते १२ हजार लोक उपस्थित राहतील असा अंदाज आहे.
संमेलनाच्या तयारीचा एक भाग म्हणून संपूर्ण घुमान गावाची साफसफाई करण्यात येणार आहे. स्वच्छ आणि सुंदर घुमान येणाऱ्या पाहुण्यांना पाहायला मिळेल.
-विजय झाडे, वरिष्ठ अधिकारी