भाजपा सरकार अदाणींवर पुन्हा मेहरबान झालं असून अदाणींसाठी सत्ता राबवली जाते आहे असा आरोप वर्षा गायकवाड यांनी केला आहे. कुर्ला येथील मदर डेअरीची २१ एकरची जागा अदाणींच्या घशात घालण्याचे सरकारी फर्मान निघाले आहे. त्यासाठी कोणतीही टेंडर प्रक्रिया राबवण्यात आलेली नाही असंही वर्षा गायकवाड यांनी म्हटलं आहे. कोट्यवधी रुपये किंमतीची ही मोक्याची जागा गौतम अदाणींना सरकारने बहाल केला आहे. हा एक महाघोटाळा आहे असाही आरोप वर्षा गायकवाड यांनी केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

खासदार वर्षा गायकवाड काय म्हणाल्या?

खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या की, “मोदाणी (मोदी आणि अदाणी) अँड कंपनीला संपूर्ण मुंबई गिळायची आहे आणि त्यासाठी वाटेल त्या थराला जाण्याची भूमिका भाजपा सरकारने घेतलेली आहे. जी जमीन सरकारी आहे, ती जमीन अदाणींची आहे, असा प्रकार सुरु आहे. भाजपा सरकारने अदाणींसाठी धारावी टेंडर आणि टीडीआर महाघोटाळा केला आणि धारावीकरांचा हक्क मारण्याचा कट रचला. नंतर धारावी पुनर्वसनाच्या नावाने पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील असणाऱ्या मिठागरांच्या जमिनी व पूर्वी जकात नाक्यासाठी असलेली मुलुंड येथील महापालिकेची जागा आणि डम्पिंग ग्राउंडची जागा लुबाडण्याचा डाव मांडला. आता पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील असणारी कुर्ला येथील मदर डेअरीची जागा यांना गिळून टाकायची आहे. कुणालाही विश्वासात न घेता, कुठलीही जनसुनावणी न करता हा हिरवळीचा भूखंड अदाणींच्या घशात घातला जात आहे. परंतु धारावी पुनर्वसनाच्या नावाखाली अदाणीला नाममात्र दराने हा भूखंड भेट देण्याचा डाव हाणून पाडू”, असा इशारा वर्षा गायकवाड यांनी दिला आहे.

या भूखंडावर अदाणींचा डोळा होता म्हणूनच तो त्यांना दिला जातोय

‘मदर डेअरी’ने पूर्वी वापरलेल्या कुर्ला येथील या भूखंडावर सुमारे ९०० मौल्यवान झाडं आहेत, ज्यांच्यामुळे इथला परिसर हा पर्यावरणपूरक आणि संवेदनशील आहे. पण या झाडांची निर्दयीपणे कत्तल करून या इको-सेन्सिटिव्ह भूखंडच्या मुद्रीकरणाचे मनसुबे महाभ्रष्टयुती सरकारचे आहेत. यापूर्वी भाजपाच्याच एका उच्चपदस्थ नेत्याचा डोळा या भूखंडावर पडला होता आणि या जागी औद्योगिक संकुल उभारण्याचा खेळ मांडला होता. त्यासाठी काही महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एमएमआरडीएची विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती केली होती. पण आता पंतप्रधान नरेंद्र मोदींचे परम मित्र अदाणींची नजर या भूखंडावर पडली आहे. एकनाथ शिंदेंच्या पूर्वीच्या आदेशांना केराची टोपली दाखवत महसूल व दुग्धविकास विभागाने ही जागा अदानीच्या DRPPL ला भेट देण्याचा GR काढला आहे.

काँग्रेस पक्षाची भूमिका स्पष्ट असून एकाही धारावीकराला विस्थापित होऊ देणार नाही, प्रत्येक धारावीकराचे पुनवर्सन धारावीतच झाले पाहिजे. पात्र-अपात्र आम्ही मानत नाही अशी आमची भूमिका असल्याचं वर्षा गायकवाड यांनी म्हटलं आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gift of 21 acre plot in mumbai for gautam adani by maharashtra government allegation of congress mp varsha gaikwad scj