मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात विशेषत: मुंबई व आसपासच्या शहरांमध्ये वारंवार मराठी भाषिक आणि अमराठी भाषिकांमध्ये वादाच्या घटना घडत आहेत. परिणामी मराठी व अमराठी वाद निर्माण होऊन राजकीय वातावरणही पेटलेले पाहायला मिळत आहे. या घटनांचे पडसाद गुढीपाडव्यानिमित्त आयोजित शोभायात्रांमध्येही उमटलेले आहेत. ‘आमच्या महाराष्ट्रात मराठी माणसांनी ताटात काय खायचे हे फक्त आम्हीच ठरवणार’ असा मजकूर असलेला फलक गिरगावमधील शोभायात्रा मार्गावर लावून ‘आम्ही गिरगावकर’ संस्थेने अप्रत्यक्षपणे अमराठी भाषकांना इशारा दिला आहे.
विविध संकल्पनांवर आधारित चित्ररथ देखावे, पारंपरिक पेहरावात सहभागी झालेल्या युवा वर्गाची उत्साही गर्दी, लेझीम पथक व ध्वज पथकांची लगबग आणि ढोल – ताशांच्या गजराने मुंबईनगरी दुमदुमली आहे. युवा पिढीचा उत्साही माहोल पाहायला मिळत असून विविध ठिकाणी असणाऱ्या शोभायात्रांमधून सामाजिक संदेश देण्यासह विविध विषयांवर भाष्य करण्यात आले आहे.
महाराष्ट्रासह विशेषतः मुंबईत मराठी माणसाला घर नाकारण्यापासून नोकरी नाकारण्यापर्यंतच्या विविध घटना अलीकडच्या काळात समोर आल्या आहेत. विशेषतः जैनबहुल इमारतींमध्ये मांसाहाराचा मुद्दा उपस्थित करीत मराठी माणसाला घर खरेदी आणि घर भाड्याने घेणे नाकारल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर ‘आमच्या महाराष्ट्रात मराठी माणसांनी ताटात काय खायचे हे फक्त आम्हीच ठरवणार’ असा मजकूर असलेला फलक गिरगावमधील शोभायात्रा मार्गावर लावून ‘आम्ही गिरगावकर’ संस्थेने अप्रत्यक्षपणे भाष्य करीत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
दरम्यान, मराठी भाषिकांना घर नाकारणाऱ्या विकासकांविरुद्ध कडक कारवाई करा आणि विधानसभेच्या अधिवेशनात आवश्यक तो कायदा करून मराठी भाषकांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी करणारा भलामोठा फलक ‘आम्ही गिरगावकर’ संस्थेतर्फे गिरगाव परिसरात अलीकडेच लावण्यात आला होता. मात्र कोणताही वाद निर्माण होऊ नये, यासाठी हा फलक तातडीने हटविण्यात आला होता.
© The Indian Express (P) Ltd