मुंबई : सध्याच्या स्पर्धात्मक जगात विविध क्षेत्रात झपाट्याने बदल होत आहेत. युवा पिढीही स्मार्टफोनच्या चौकटीत अडकली असून समाजमाध्यमांच्या जाळ्यात गुंतलेली आहे. तसेच प्रत्यक्ष वाचनाकडे पाठ फिरवून समाजमाध्यमांवरील पोस्ट वाचण्याकडेच अधिक कल पाहायला मिळतो आहे. परिणामी, सध्या सर्वच ग्रंथालयांची अवस्था बिकट होत चालली असून सदस्य संख्या झपाटयाने घटत आहे. ग्रंथालयामध्ये जाऊन पुस्तके घेणाऱ्यांची संख्याही कमी होत आहे. हेच जाणून युवा पिढीसह सर्व नागरिकांमध्ये मराठी वाचन संस्कृती रुजावी, टिकावी आणि यामधून समाज समृद्ध व्हावा, या उद्देशाने ‘मराठी भाषा गौरव दिनाचे’ औचित्य साधून गिरगाव प्रबोधन संस्थेने ऐतिहासिक वारसा जपणाऱ्या मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या गिरगावमधील शाखेचे, तसेच अन्य ग्रंथालयांचे सभासद होण्याचे आवाहन करीत जनजागृती मोहीम सुरू केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गिरगाव प्रबोधन संस्थेने विभागातील नागरिकांना, मंडळाना व विविध सामाजिक संस्थांची भेट घेतली आणि मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाचे तसेच इतर कोणत्याही ग्रंथालयाचे सभासद होण्यासंदर्भातील आवाहन पत्र देत त्यांच्याशी संवाद साधला. तसेच मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाची गिरगावमधील शाखा अधिक सशक्त करून मराठी भाषेतील साहित्याचा ठेवा जपण्यासाठी पुढाकार घेण्याची विनंतीही करण्यात आली. तर ‘गिरगाव प्रबोधन संस्थेच्या काही सभासदांनी स्वतः मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या गिरगावमधील शाखेत जाऊन सभासद नोंदणी केली, तर संस्थेचे काही सभासदही लवकरच नोंदणी करणार आहेत. या ग्रंथसंग्रहालयात विविध विषयांवरील हजारो मराठी पुस्तके, ग्रंथ, कादंबरी असून वृत्तपत्रही वाचायला मिळतात. गिरगाव प्रबोधन संस्थेतर्फे विविध सामाजिक – सांस्कृतिक उपक्रम राबविण्यात येतात. त्याप्रमाणे वाचन संस्कृती रुजविण्यासाठी व सर्वांवर वाचन संस्कार होण्यासाठी राबविलेला हा महत्त्वाचा उपक्रम आहे’, अशी माहिती गिरगाव प्रबोधन संस्थेचे अध्यक्ष केदार नार्वेकर यांनी दिली.