राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांच्या ‘लोक माझे सांगाती’ या राजकीय आत्मकथेच्या सुधारित आवृत्तीचं मंगळवारी (२ मे) मुंबईतील यशवंतराव चव्हाण सभागृहात प्रकाशन झालं. यावेळी लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी शरद पवारांच्या पत्नी प्रतिभा पवार यांनीही त्यांचं आत्मचरीत्र लिहावे, असं आवाहन केलं. तसेच हे लिहणं किती महत्त्वाचं आहे हे सांगताना त्यांनी अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांच्या पत्नी मिशेल ओबामांचं उदाहरण दिलं.
गिरीश कुबेर म्हणाले, “शरद पवारांनी अधिक लिहायला हवं. या पुस्तकाला शुभेच्छा देतो. मात्र, प्रतिभा पवार यांनीही लिहायला हवं. त्याचं कारण असं आहे की, शरद पवारांनी सांगितली ती पहिली बाजू आहे. त्या पहिल्या बाजूला दुसरी बाजूही असते. त्यामुळे त्यावर अनेक अंगांनी लिहायला हवं. प्रतिभा पवार शरद पवारांच्या राजकीय जीवनावर लिहिणार नाही असं म्हणत असल्या तरी तो आग्रह करायला हवा.”
“आज सत्ता मिरवण्याची गोष्ट गोष्ट झाली आहे”
“नवरा मुख्यमंत्री असताना प्रतिभा पवार मुलगी सुप्रिया सुळेंना गाडी चालवत शाळेत सोडायला जायच्या. आल्यानंतर वर्षाचे सुरक्षारक्षकांनी त्यांना अडवलं आणि तुम्ही कोण असं विचारलं होतं. आता तो काळ गेला आहे. आज सत्ता मिरवण्याची गोष्ट गोष्ट झाली आहे. मी ठाण्यात राहतो. येताना टोल पार करून यावं लागतं. तेथे छोटा नगरसेवकही टोलवाल्याला मला ओळखलं नाही का म्हणतो. आपण अशा कालखंडात वावरत आहोत,” असं मत गिरीश कुबेर यांनी व्यक्त केलं.
हेही वाचा : VIDEO: राजकीय आयुष्याबाबत शरद पवारांची मोठी घोषणा; म्हणाले, “मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या…”
“प्रतिभा पवार यांच्याकडे सांगण्यासारख्या खूप गोष्टी”
गिरीश कुबेर पुढे म्हणाले, “महाराष्ट्रात असाही काळ होऊन गेला जेव्हा सत्ता अशाप्रकारे मिरवायची नसते. प्रतिभा पवार यांच्याकडे अशा सांगण्यासारख्या खूप गोष्टी आहेत. त्यांनी सांगायला हव्यात. याचं कारण सांगण्यासाठी मी एक उदाहरण देईल. मी तुलना या अर्थाने म्हणत नाही. जून २००८ मध्ये अमेरिकेत निवडणुकीचे वारे होते. त्यावेळी तेथे बँकिंग संकट आलं. लेमन ब्रदर्स कोसळली. पुढे निवडणुका झाल्या.”
“माझा नवरा निवडणुकीत उभा आहे आणि…”
“जी व्यक्ती निवडून आली त्या व्यक्तीच्या पत्नीची मुलाखत व्हॅनिटी फेअर नावाच्या आंतरराष्ट्रीय मासिकाने घेतली. मुलाखतकाराने तिला अनेक प्रश्न विचारले. त्यांना उत्तरं देताना ती म्हणाली की, माझा नवरा निवडणुकीत उभा आहे आणि तो अध्यक्ष होईल असं दिसतं आहे. त्यामुळे माझ्या आयुष्यात आता अनेक बदल होणार आहेत. तो त्याचा राजकीय विजय आहे आणि तो त्याला मिळेलच. मात्र, एका गोष्टीची मला काळजी वाटते आहे,” अशी माहिती गिरीश कुबेर यांनी दिली.
व्हिडीओ पाहा :
“ते ऐकून तरी प्रतिभा पवार लिहायला लागतील”
हा किस्सा सांगताना गिरीश कुबेर पुढे म्हणाले, “ही निवडणूक अमेरिकेतील आहे. अध्यक्षपदावर निवड होईल याची १०० टक्के खात्री आहे अशा व्यक्तीच्या पत्नीची मुलाखत आहे. तिला मुलाखत घेणाऱ्याने विचारलं की, तुझ्यासाठी काळजीचा मोठा प्रश्न कोणता? त्यावेळी त्या पत्नीने दिलेलं उत्तर खूप महत्त्वाचं आहे. ते ऐकून तरी प्रतिभा पवार लिहायला लागतील. ती पत्नी म्हणजे मिशेल ओबामा. त्यांनी असं म्हटलं की, आता आम्ही व्हाईट व्हाऊसमध्ये राहायला जाणार आहोत, पण माझ्या दोन मुलींच्या शाळा प्रवेशाचं काय याची मला काळजी आहे.”
हेही वाचा : शरद पवारांच्या ‘त्या’ विधानाने चर्चांना उधाण, हे बदलाचे संकेत? अजित पवार म्हणाले…
“शरद पवारांनी त्यांच्या कालखंडातील माणसांवर लिहावं”
“जगाच्या महासत्तेच्या प्रमुखपदी बसलेल्या व्यक्तीच्या पत्नीचा हा अनुभव आहे. एवढ्या शक्तीमान व्यक्तीच्या आयुष्यात राहत असताना आजूबाजूला ज्या घटना घडत असतात त्या घटना त्या समाजाची स्पंदनं टिपणारं असतं. म्हणून महाराष्ट्रासाठी प्रतिभा पवार यांच्याकडून हा तपशील येणं फार गरजेचं आहे. शरद पवारांनी त्यांच्या कालखंडातील माणसांवर लिहावं. ते तपशील सर्वांना माहिती नाहीत. त्यावर त्यांनी पुस्तक लिहावं,” असंही गिरीश कुबेर यांनी नमूद केलं.