लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई: मानखुर्द परिसरात राहणाऱ्या एका तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून प्रियकराने तिची उरण येथे हत्या केल्याची घटना उघकीस आली आहे. या घटनेनंतर मानखुर्दमध्ये संताप व्यक्त होत असून आरोपीवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी रहिवाशांकडून करण्यात येत आहे.
उरण येथील चिरनेर-खारपाडा मार्गालगतच्या खड्ड्यात गोणीत भरलेल्या अवस्थेत या तरूणीचा मृतदेह सापडला. निजामुद्दीन शेख (२७) असे आरोपीचे नाव असून मानखुर्द पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन नंतर उरण पोलिसांच्या हवाली केले.
आणखी वाचा-मुंबईतील ११ हजार घरांची एप्रिलमध्ये विक्री, मार्चच्या तुलनेत घर विक्रीत घट
तरुणी मानखुर्द येथील अण्णाभाऊ साठे नगर परिसरात वास्तव्यास होती. आरोपी हा टॅक्सीचालक असून तो शिवाजीनगर ते नागपाडा दरम्यान टॅक्सी चालवायचा. मृत तरूणीही नागपाडा येथे घरकामासाठी जायची. चार वर्षांपूर्वी दोघांची ओळख झाली आणि ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. मृत तरूणी १८ एप्रिल रोजी कामाला गेली. दुपारी तिने भावाला फोन करून रात्री यायला उशीर होईल, असे कळवले. परंतु, ती घरी परतलीच नाही. सर्वत्र शोध घेऊनही ती सापडली नाही. त्यामुळे, १९ एप्रिल रोजी तिच्या आईने मानखुर्द पोलीस ठाण्यात मुलगी हरविल्याची तक्रार नोंदवली.
आणखी वाचा-मुंबई : ‘मेट्रो वन’कडे ४६१ कोटींचा थकीत मालमत्ता कर
मृत तरूणीचा शोध सुरू असताना २४ एप्रिल रोजी पोलिसांनी निझामुद्दीन याला चौकशीसाठी बोलावले. त्यानंतर, दुसऱ्याच दिवशी मृत तरूणीचा मृतदेह उरण येथे सापडला. दरम्यान, लग्नाचे आमिष दाखवून आरोपीने आठ दिवसांपूर्वी १८ एप्रिल रोजी तिला कल्याण येथील खडवली परिसरात नेले. तेथे काही दिवस राहिल्यानंतर आरोपीने तिची गळा आवळून हत्या केली. त्यानंतर, तिचा मृतदेह गोणीत भरून उरणमधील चरनेर – तिघाटी रस्त्यावर फेकून दिला, असे पोलिसांनी केलेल्या चौकशीतून उघड झले. मूळचा उत्तर प्रदेश येथील रहिवासी असलेल्या निझामुद्दीन याचा मुंबईत राहण्याचा ठिकाणा नाही. मिळेल त्याची टँक्सी चालवायचा आणि कुठेही राहायचा. विशेष म्हणजे, निझामुद्दीन विवाहित असून त्याची बायको गावी असते.