मुंबई : वांद्रे पूर्व येथील एका जुन्या इमारतीत १८ वर्षीय तरूणीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली निर्मल नगर पोलिसांनी ३१ वर्षीय तरूणाला अटक केली. शीतपेयात गुंगीचे औषध मिसळून तिच्यावर दोघांनी बलात्कार केल्याची तक्रार पीडित तरूणीने दिली होती. पण तिच्या दाव्यात तूर्तास तथ्य आढळलेले नाही. पीडित मुलगी सध्या रुग्णालयात दाखल असून तिची प्रकृती स्थिर असल्याचे सूत्रांनी सांगितले. तक्रारदार तरूणी १८ वर्षांची असून ती मुळचीची उत्तर प्रदेशमधील आजमगड जिल्ह्यातील रहिवासी आहे.
हेही वाचा >>> वरिष्ठ पोलीस निरीक्षकाला साडेतीन लाखांची लाच स्वीकारताना अटक
ऑक्टोबरच्या सुरुवातीला ती काका – काकूला भेटण्यासाठी मिरा रोड येथे गेली होती. त्यांच्याबरोबर राहत असताना संपत्तीवरून तिचा त्यांच्याशी वाद झाला होता. काकांनी संपत्तीच्या कागदपत्रांवर जबरदस्तीने स्वाक्षरी करून घेतल्या. त्यानंतर ५ ऑक्टोबर रोजी ती मुंबईतील पर्यटनस्थळे पाहण्यासाठी काकांसोबत गेली होती. त्यावेळी तिच्या काका-काकूंनी तिला रेल्वेत बसवले. मात्र ते त्या रेल्वेत बसलेच नाही. त्यामुळे ती वांद्रे स्थानकावर उतरली आणि आसपासच्या परिसरात फिरत असताना आरोपी फिरोज खान (३१) याच्यासोबत तिची भेट झाली होती. दरम्यान, काही स्थानिक रहिवाशांनी मंगळवारी या मुलीला पोलीस ठाण्यात आणले आणि पोलीसांनी तिची चौकशी केली.
हेही वाचा >>> मुंबई : पत्राचाळीतील २,१७५ घरांच्या बांधकामाचा मार्ग मोकळा
दोन व्यक्तींनी काका-काकूकडे नेण्याच्या बहाण्याने तिला मोटरगाडीत बसवले. त्यानंतर मोटरगाडीमध्ये तिला शीतपेय दिले. त्यात गुंगीचे औषध होते. त्यानंतर तिच्यावर दोघांनी आळीपाळीने बलात्कार केला, असे तिने पोलिसांना सांगितले. आरोपींमध्ये खानचाही समावेश होता. त्यांतर पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल केला. सीसी टीव्ही कॅमेऱ्यातील चित्रणाची तपासणी केली असता तिच्यासोबत एकच व्यक्ती असल्याचे निदर्शनास आले. तसेच आणखी एका सीसी टीव्ही कॅमेऱ्यातील चित्रणात खानसोबत ती जात असल्याचे आढळले. तिच्यावर जबरदस्ती करण्यात आल्याचे कोणतेही पुरावे अद्याप पोलिसांना मिळालेले नाहीत. तिच्या पोटात दुखत असल्याने ती रस्त्याच्या बाजूला रडत होती. तेव्हा स्थानिकांनी तिला पोलीस ठाण्यात आणले. कुटुंबीय ओरडतील म्हणून तिने गुंगीचे औषध देऊन दोघांनी अत्याचार केल्याचे तिने सांगितल्याचा संशय आहे. पीडित मुलगी तिचा जबाब वारंवार बदलत आहे. तसेच तिच्या काका-काकूंचा संपर्क क्रमांकही देत नसल्याचे सूत्रांनी सांगितले. याप्रकरणी खानला अटक करण्यात आली आहे. तसेच ती खानला ओळख नसल्याचे तिने जबाबात सांगितले. तिच्या दाव्यांची पडताळणी करण्यात येत असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.