कामावरून घरी परतणाऱ्या एका १९ वर्षीय तरुणीला रस्त्यात अडवून चाकूचा धाक दाखवित तिच्यावर तिघा तरुणांनी महिनाभराच्या अंतराने दोन वेळा सामूहिक बलात्कार केल्याचा संतापजनक प्रकार भिवंडी येथे उघडकीस आला आहे. शिवराम नगर परिसरात रहाणाऱ्या या तरुणीवर तब्बल महिनाभरापुर्वी तिघा नराधमांनी बलात्कार केल्यानंतर तिला जीवे मारण्याची धमकी दिली होती. यामुळे घाबरलेल्या तरुणीने हा प्रकार कुणालाही सांगितला नव्हता. पंधरवडय़ापुर्वी या तरुणांनी पुन्हा गाठून तिच्यावर बलात्कार केला. अखेर या तरुणीने पोलिसांकडे तक्रार नोंदविल्यानंतर दोघा तरुणांना पोलिसांनी अटक केली आहे, तर एक आरोपी फरार आहे.
नारपोली पोलिसांनी याप्रकरणी जितेंद्र राममिलन यादव (२८), सुरेंद्र राममिलन यादव (३५) अशा दोघांना अटक केली आहे, तर सत्येंद्र यादव हा आरोपी फरार आहे. भिवंडी न्यायालयाने त्यांना २८ सप्टेंबर पर्यंतची पोलीस कोठडी सुनावली आहे. भिवंडीतील शिवराम नगर भागात राहणारी १९ वर्षीय तरूणी दिड महिन्यापूर्वी कामावरून घरी जात होती. त्यावेळी कामतघर साईनगर येथे राहणाऱ्या जितेंद्र, सुरेंद्र आणि सत्येंद्र या तीघांनी त्या तरूणीचा रस्ता आडवून तीला चाकूचा धाक दाखवला. टेम्पोत घालून तीचे अपहरण केले. त्यानंतर अंजूरफाटा येथील एका गल्लीत तीघांनी त्या तरुणीवर बलात्कार केला होता. घडलेला प्रकार उघड केल्यास घरच्यांना ठार मारण्याची धमकी आरोपींनी दिली . त्यामुळे घाबरलेल्या तरुणीने या घटनेची कुठेही वाच्यता केली नाही. त्यानंतर पुन्हा पंधरा दिवसांपूर्वी या तीघांनी तीच्यावर बलात्कार केला. त्यानंतर मात्र घरच्यांच्या मदतीने तिने नारपोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीसांनी जितेंद्र आणि सुरेंद्र या दोन भावांना अटक केली असून तीसरा आरोपी सत्येंद्र हा मात्र फरार आहे.
अल्पवयीन मुलीवर अत्याचार
ठाणे- ठाण्यातील राबोडी परिसरात राहणाऱ्या एका पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर दोघा तरुणांनी वेगवेगळ्या ठिकाणी बलात्कार केल्याचे उघड झाले आहे. आरोपींपैकी एक तरुण १७ वर्षीय अल्पवयीन आहे.
ठाणे महापालिकेच्या राबोडी येथील शाळेत इयत्ता आठवीत ही मुलगी शिकते. तिच्या ओळखीच्या १७ वर्षीय तरुणांने तिला फुस लावून मनिषानगर येथे नेले आणि तिच्यावर बलात्कार केला. या घटनेनंतर शोएब उमर फारूक खाटीक या २४ वर्षीय तरुणाने देखील त्या तरुणीशी मैत्री करून तिला लग्नाचे अमिष दाखवत उपवन मधील एका लॉजवर नेउन तीच्यावर सहा वेळा बलात्कार केला.
फसवणूक लक्षात आल्यानंतर मुलीने राबोडी पोलिसात तक्रार दाखल केली. हा प्रकार १३ जुलै ते १३ सप्टेंबर दरम्यान घडला असून तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी शोएब याला राबोडीतून अटक केली तर दुसरा अल्पवयीन आरोपीस पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याची माहिती पोलिस निरिक्षक ए. जी. चव्हाण यांनी दिली.
अपहरण करून बलात्कार
मुंबई- कांदिवलीत राहणाऱ्या १५ वर्षीय मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी कुरार पोलिसांत अपहरण व बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे.
कांदिवली येथे राहणारी ही युवती पाच सप्टेंबरपासून बेपत्ता होती. १३ सप्टेंबर रोजी ती आपल्या घरी परतली. गुजरातमध्ये नेऊन दोघांनी आपल्यावर बलात्कार केल्याचे तिने कुटुंबियांना सांगितले. एका महिलेने दिलेला प्रसाद खाल्ल्यानंतर आपली शुद्ध हरपली, आणि शुद्धीवर आले तेव्हा एका खोलीत बंद केल्याचे लक्षात आले. या खोलीतच आपल्यावर बलात्कार झाला, अशी माहिती या मुलीने दिली, त्यानुसार पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली. ही मुलगी आपल्या प्रियकरासोबत गेली होती. आम्ही त्याच्यावर बलात्कार व अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. मुलगी सतत जबाब बदलत आहे. नेमका बलात्कार कुठे झाला ते सांगू शकत नाही, असे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुभाष डफळे यांनी सांगितले. तसेच या प्रकरणी तपासासाठी एक पथक गुजरातला पाठवल्याचेही ते म्हणाले.