मुंबई : बीएससी माहिती तंत्रज्ञान अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थिनीने चेंबूरमधील वसतिगृहात बुधवारी रात्री गळफास लावून आत्महत्या केली. याप्रकरणी चेंबूर पोलिसांनी अपमृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.
दिक्षा कांबळे (२३) असे या विद्यार्थिनीचे नाव असून ती चेंबूरच्या समाजिक न्याय व विशेष सहायक विभागाच्या माता रमाबाई आंबेडकर शासकीय वसतिगृहात राहत होती. मूळची देवगड येथील रहिवासी असलेली ही विद्यार्थिनी वरळीमधील ससमिरा इन्स्टिट्यूट कॉमर्स ॲण्ड सायन्स महाविद्यालयात बीएससी माहिती तंत्रज्ञान अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षात शिकत होती. बुधवारी रात्री जेवण झाल्यानंतर ती काही वेळ मोबाइलवर बोलत होती. त्यानंतर ती एका खोलीत गेली. तेथे तिने गळफास लावून आत्महत्या केली.
बराच वेळ दिक्षा खोलीबाहेर न आल्याने तिच्या मैत्रीणींनी दरवाजा ठोठावला. मात्र काहीच प्रतिसाद मिळत नसल्याने वसतिगृहाच्या अधिकाऱ्यांनी दरवाजा तोडला असता तिने गळफास लावून घेतल्याचे आढळले. घटनेची माहिती मिळताच चेंबूर पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी दिक्षाचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी राजावाडी रुग्णालयात पाठवला. दिक्षाच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.