मुंबईः लक्ष्मीपूजनाच्या दिवशी दिव्यामुळे कपड्यांना आग लागून भाजलेल्या १८ वर्षीय महाविद्यालयीन तरूणीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. या अपघातात मुलगी ६५ टक्के भाजली होती. निधी मकवाना(१८) असे मृत मुलीचे नाव असून ती खार पश्चिम येथील इमारतीत कुटुंबियासोबत राहात होती. तिचे वडील व्यावसायिक असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
हेही वाचा >>> मुंबई : सेंच्युरी मिल संक्रमण शिबिर परिसरातील खड्डयात पडून बीडीडीवासीयाचा मृत्यू
लक्ष्मीपूजनाच्या दिवशी रात्री साडेआठ वाजता निधी घरातील गॅलरीमध्ये आली असता तेथील दिव्यामुळे तिच्या ओढणीला आग लागली. ती खिडकीतून बाहेर बघत असताना चटका लागल्यामुळे तिने बघितले असता तिच्या कपड्यांना आग लागली होती. तिने आरडाओरडा केल्यानंतर कुटुंबियांनी आग विझवली. पण तिचे कपडे टेरिकॉटचे असल्यामुळे तिला गंभीर इजा झाली. त्यामुळे तिला वांद्रे येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिला पुढील उपचारासाठी चिंचपोकळी जवळील कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी तिचा जबाब नोंदवला असता तिने लक्ष नसताना दिव्यामुळे आग लागल्याचे सांगितले. मुलीच्या हात, पाय व पोटाला भाजले होते. उपचारादरम्यान शनिवारी तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी खार पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली आहे. मृत मुलीच्या कुटुंबियांची कोणाविरोधात तक्रार नाही.