लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई: बेकरीमध्ये लाकूड आणि कोळशाच्या वापरावर बंदी घालण्याअगोदर मुंबई महापालिकेने बेकरी मालक आणि इराणी कॅफे यांना आपले म्हणणे मांडण्याची संधी द्यावी. वायू प्रदूषण नियंत्रण समितीसमोर म्हणणे मांडण्यासाठी तातडीने सुनावणी घ्यावी, अशी मागणी समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी केली आहे.
लाकूड व कोळसा यांचा इंधन म्हणून उपयोग करणाऱ्या भट्टी (बेकरी), हॉटेल्स्, उपाहारगृहे हे देखील वायू प्रदूषणास कारणीभूत ठरत असल्यामुळे उच्च न्यायालयाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. यासंदर्भात उच्च न्यायालयात ९ जानेवारी २०२५ रोजी झालेल्या सुनावणीच्या वेळी सहा महिन्यांच्या मुदतीत लाकूड व कोळसा इंधन आधारीत व्यावसायिकांनी पर्यायी स्वच्छ इंधनाचा अवलंब करण्याचे आदेश दिले आहेत. त्याची अंमलबजावणी करण्यासाठी मुंबई महापालिका प्रशासनाने या सर्व व्यावसायिकांना ८ जुलै २०२५ ची मुदत दिली आहे, तशा नोटीसाही पाठवल्या आहेत. या निर्णयामुळे बेकरी व्यावसायिक संकटात सापडले असून या निर्णयाचे पडसाद उमटू लागले आहे.
लोकप्रतिनिधींनीही हा विषय उचलून धरला आहे. भाजपचे माजी नगरसेवक मकरंद नार्वेकर यांनीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून ईराणी कॅफेला या कोळसा बंदीतून सूट देण्याची मागणी केली आहे. त्यातच आता समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनीही या प्रश्नी चिंता व्यक्त केली असून बेकरी मालक व ईराणी कॅफे यांना त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी तातडीने सुनावणी देण्याची मागणी केली आहे.
आमदार रईस शेख यांनी पालिका आयुक्त भूषण गगराणी यांना पत्र लिहिले आहे. लाकडावर चालणाऱ्या भट्टया स्वच्छ आणि अधिक शाश्वत इंधन स्रोतांकडे वळण्यासाठी इराणी कॅफे आणि बेकरीसह बेकर्सना मोठ्या आव्हानांना तोंड द्यावे लागत आहे. पाइप गॅसची उपलब्धता आणि आवश्यक विद्युत पायाभूत सुविधांचा अभाव यामुळे या बेकऱ्यांना स्वच्छ इंधन पर्यायांचा अवलंब करण्यात मोठा अडथळा आहे. बेकऱ्या स्वच्छ इंधनावर रुपांतरित करण्याच्या या निर्णयामुळे बेकरी उद्योग धोक्यात आला आहे. तसेच या बेकरीशी संबंधित कामगार आणि मालकांच्या उपजीविकेलाही धोका निर्माण झाला असल्याचे रईस शेख यांनी पत्रात म्हटले आहे.
पावाच्या किंमतीही वाढणार
बेकरी भट्टया विद्युत यंत्रणेवर किंवा पीएनजीवर रुपांतरित झाल्यास पावाच्या किंमतीही वाढण्याची शक्यता असल्याचे मत रईस शेख यांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे खाणे असलेला वडापाव आणि मिसळ पाव यांच्या किंमतीही वाढण्याची शक्यता आहे. पावाच्या पुरवठ्यात अडथळा निर्माण झाल्यामुळे भविष्यात किमती वाढतील. पावची सध्याची किंमत ३ रुपयांवरून ५ रुपयांपर्यंत जातील, असेही शेख यांनी म्हटले आहे.