मुंबई : मुंबई महानगरपालिका मुख्यालयात मुंबई शहर आणि उपनगर जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांना कार्यालये देण्यात आली आहेत. त्याच धर्तीवर मुंबई महानगरपालिका मुख्यालयात विरोधी पक्षनेते म्हणून आम्हालाही कार्यालय द्यावे या मागणीचा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पुनरुच्चार केला आहे. मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील पालकमंत्र्यांचे कार्यालय म्हणजे भाजपाचा अड्डा बनल्याची टीकाही त्यांनी केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अंबादास दानवे यांनी गुरुवारी मुंबई महानगरपालिका मुख्यालयाला भेट दिली. त्यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी पुन्हा एकदा ही मागणी केली. उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांना २१ जुलै रोजी महानगरपालिका मुख्यालयात पहिल्या मजल्यावर दालन देण्यात आले होते. त्याला राजकीय वर्तुळातून विशेषतः ठाकरे गटाने मोठा विरोध केला होता. हे दालन लोढा यांना देऊ नये अशी मागणीही आमदार आदित्य ठाकरे यांनी केली होती. मात्र पालकमंत्र्यांच्या मागणीमुळे हे दालन देण्यात आल्याचे महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी या वादावर आपली भूमिका मांडताना स्पष्ट केले होते. तसेच शहर जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी मागणी केल्यास त्यांनाही दालन दिले जाईल, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले होते. जुलै महिन्यात लोढा यांना दालन देण्यात आले होते. त्यानंतर ऑक्टोबरमध्ये शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांना पहिल्या मजल्यावर लोढा यांच्या दालनाशेजारचे दालन देण्यात आले आहे.

हेही वाचा – मुंबई : अर्धवट जळालेल्या अवस्थेत महिलेचा मृतदेह सापडला

लोढा यांना दालन दिल्यानंतर त्यावर मोठ्या प्रमाणावर विरोधी पक्षाकडून टीका झाली होती. लोढा यांना दालन दिल्यामुळे भाजपाच्या माजी नगरसेवकांना हक्काचे कार्यालय मिळाल्याची टीकाही विरोधी पक्षातील लोकप्रतिनिधींनी केली होती. आता आम्हालाही कार्यालय द्यावे अशी मागणी दानवे यांनी केली आहे.

हेही वाचा – मुंबईः इमारतीच्या सुरक्षा रक्षकाने केला १० वर्षांच्या मुलीचा विनयभंग; ५५ वर्षीय आरोपीला अटक

शिवसेनेच्या दोन गटांतील वादामुळे महानगरपालिका मुख्यालयातील राजकीय पक्षांची सर्व कार्यालये टाळेबंद करण्यात आली आहेत. त्यामुळे माजी नगरसेवकांना पालिका मुख्यालयात हक्काचे कार्यालय नाही. मात्र आता भाजपपाठोपाठ केसरकर यांच्या दालनामुळे शिंदे गटाच्या माजी नगरसेवकांनाही हक्काचे कार्यालय मिळाले आहे. पालकमंत्र्यांच्या कार्यालयात भाजपचे माजी नगरसेवकच असतात, त्यामुळे हा भाजपचा अड्डा असल्याची टीका दानवे यांनी केली आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Give us an office in the mumbai mnc headquarters demanded ambadas danve mumbai print news ssb