‘सर्व शिक्षा अभियाना’अंतर्गत आनंददायी शिक्षण व सातत्यपूर्ण र्सवकष मूल्यांकनाच्या प्रशिक्षणासाठी मुंबईतील जवळपास ५० टक्के शिक्षकांना आपल्या वर्गावर सक्तीची दांडी मारावी लागणार असल्याने मुंबईतील तीन हजार शाळांमध्ये सोमवारपासून पुढील पाच दिवस ‘आनंदीआनंद’ असणार आहे.
बारावीच्या परीक्षा तोंडावर आल्याने त्याची तयारी तर शिक्षकांना करावी लागत असतानाच तब्बल पाच दिवसांच्या प्रशिक्षण कार्यक्रमाला हजेरी लावण्याची सक्ती शिक्षकांवर करण्यात आली आहे. आर्थिक वर्ष संपण्याच्या मार्गावर असल्याने सर्व शिक्षा अभियानासाठी मिळालेला निधी संपविण्यासाठी हा प्रशिक्षणाचा खटाटोप केला जात आहे, अशी चर्चा आहे. मुंबईतील ५० टक्के शिक्षकांना या प्रशिक्षणात सहभागी व्हावे लागणार आहे. सीएसटी ते दादर (दक्षिण विभाग) आणि दादर ते दहिसर (पश्चिम विभाग) या विभागांमधील शाळा शिक्षकांसाठी ११ ते १५ फेब्रुवारी दरम्यान प्रशिक्षण घेतले जाणार आहे. तर मुलुंड ते चेंबूपर्यंतच्या उत्तर विभागासाठी २० ते २४ फेब्रुवारी दरम्यान प्रशिक्षण घेतले जाणार आहे.
‘पालकांनो, शिकवायला या!’
एकाच वेळेस इतके शिक्षक गैरहजर राहणार असल्याने शाळा चालवायची कशी, असा प्रश्न मुख्याध्यापकांसमोर आहे. तर गैरहजर शिक्षकांचेही वर्ग सांभाळण्याची जबाबदारी उर्वरित शिक्षकांवर आल्याने त्यांची धांदल उडते आहे. गिरगावमधील एका शाळेत शिक्षकांनी काही पालकांनाच ‘वर्गात मदतीला या’ असे आवाहन केले आहे. तर एका शाळेत गैरहजर शिक्षकांच्या वर्गातील मुलांनी दंगा करू नये म्हणून भगतसिंगांवरील चित्रपट शाळेत लावून देण्यात आला होता.
‘शाळा बंद राहणार नाही
याची काळजी घेऊ’
शाळांची अडचण होत असल्यास आपण एससीआरटीईला प्रशिक्षण कार्यक्रमाचा आढावा घ्यायला लावू, असे एमपीएसपीचे प्रकल्प संचालक (सर्व शिक्षा अभियान) ए. डी. काळे यांनी स्पष्ट केले. ‘प्रशिक्षण थांबविता येणार नाही. परंतु, प्रशिक्षणामुळे शाळा बंद राहणार नाही या दृष्टीने वेळापत्रक बदलून घेण्याची सूचना एससीआरटीईला करू,’ असे ते म्हणाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा