आंदोलनांसाठी प्रसिद्ध असलेल्या आझाद मदानाच्या काही कोपऱ्यांमध्ये अजूनही इतिहासाच्या पाऊलखुणा दिसतात. त्या आता अस्पष्ट किंवा दुर्लक्षित होत चालल्या आहेत. त्या जपण्यासाठी काही खास प्रयत्न होताहेत, असे म्हणण्यासारखी परिस्थिती दुर्दैवाने नाही..
आझाद मदान.. ब्रिटिशकालीन मुंबईला लागलेल्या आगीनंतर शहाणपणा येऊन ब्रिटिशांनी मोकळी सोडलेली जागा.. १८५७च्या बंडात मुंबईतील दोन सनिकांना तोफेच्या तोंडी देण्यात आलं ती जागा.. मुंबईच्या क्रिकेटची मक्का.. आझाद मदान किंवा एस्प्लनाड ग्राऊंड या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या मदानाचा हा इतिहास नक्कीच देदीप्यमान आहे. या सदराच्या पहिल्याच भागात या इतिहासाची ओळख करून दिली होती, मग पुन्हा हे सगळं सांगण्याची गरज काय, असा प्रश्न उपस्थित होणं स्वाभाविक आहे. असा प्रश्न उपस्थित झाला कारण सध्या या मदानाची ओळख केवळ आंदोलनांचं मदान किंवा क्रिकेटचं मदान एवढीच मर्यादित राहिली आहे. ही ओळख त्यापलीकडे खूपच विस्तृत आहे.
आझाद मदानाच्या बाहेरून चक्कर मारताना ही ओळख पावलोपावली दिसते. कुतूहल म्हणून कधीतरी संपूर्ण आझाद मदानाला एक चक्कर मारून पाहा. अनेक ठिकाणी पावलं थबकतात. दक्षिण मुंबईत फिरताना ब्रिटिशकाळाच्या खुणा शोधण्यासाठी सरावलेल्या नजरेला काहीतरी वेगळं दिसतं आणि या मदानाची एक वेगळीच ओळख समोर येते.
आझाद मदानात अनेक पक्षांची, सरकारी विभागांची कार्यालये आहेत हे आपण याआधीच पाहिलं आहे. त्यातील एक महत्त्वाची वास्तू म्हणजे प्रेस क्लब ऑफ इंडिया! मुंबईतल्या पत्रकारांचा हा अड्डा! १९६८मध्ये मुंबईत काम करणाऱ्या काही पत्रकारांना असा एक क्लब असावा, अशी जाणीव झाली. त्या वेळी पत्रकारांचे पगार खूपच कमी होते. त्यामुळे आपल्या हक्कांबद्दल सजग असलेल्या काहींनी एकत्र येत प्रेस क्लबची स्थापना केली. २००६ नंतर या क्लबने कात टाकली आहे आणि आता हा क्लब दिमाखात उभा असलेला दिसतो. संध्याकाळी उशिरा कामं आटोपून अनेक पत्रकार आजही इथे येतात आणि मग दिवसभरातल्या घडामोडी किंवा इतर घडामोडींवर अगदी अनौपचारिक चर्चा झडतात.
हा झाला अगदी अलीकडचा इतिहास, पण या प्रेस क्लबच्या अंगावरून महापालिका मार्गाने मेट्रोच्या दिशेने चालायला लागल्यावर मेट्रोच्या थेट समोर आझाद मदानाच्याच एका भागात एक लाल-पांढऱ्या रंगाची इमारत दिसते. ही लेडी वििलग्डन इमारत! मुंबईसह चेन्नईच्या गव्हर्नर लॉर्ड वििलग्डन यांच्या पत्नीच्या नावाने असलेली ही इमारत सध्या पारशी समुदायाकडे आहे. सध्या येथे पारशी रुग्णवाहिका कक्ष आहे. ही इमारत साधारण १९१०-१९२५ या काळात बांधली गेली. लेडी वििलग्डन यांना लाल रंगाच्या छटा खूप आवडायच्या. पण त्या वेळी ही इमारत निळ्या-पांढऱ्या रंगात टेचात उभी होती. त्यानंतर या इमारतीची दुरुस्ती करण्यात आली आणि ही इमारत सध्याच्या लाल-पांढऱ्या रंगात उभी राहिली.
मुंबईतील पारशी समुदायाचं या शहरासाठीचं योगदान खूप मोलाचं आहे. मुंबईतील अनेक संस्था, वास्तू उभ्या राहण्यामागे पारशी समुदायातील अनेक द्रष्टय़ा लोकांचं सक्रिय योगदान आहे. आपल्या पारशी समाजासाठी एकत्र येऊन पारश्यांनी पारसी पंचायत स्थापन केली. ही पंचायत पारशी लोकांची सर्वेतोपरी काळजी घेते. त्यात पारशी समुदायातील गरिबांना आíथक मदत करण्यापासून त्यांच्या आरोग्याची काळजी वाहण्यापर्यंत अनेक गोष्टींचा समावेश आहे. या आरोग्याची काळजी या सदरात ही लेडी वििलग्डन इमारत महत्त्वाची भूमिका बजावते. या इमारतीत पारसी रुग्णवाहिका विभाग आहे. म्हणजे काय, तर मुंबईत कुठेही पारश्यांना रुग्णवाहिकेची गरज लागली, तर अगदी फुकटात या केंद्रावरून रुग्णवाहिका पाठवली जाते. इतर समाजांसाठीही ही सोय उपलब्ध आहे, पण त्यासाठी त्यांना काही शुल्क मोजावे लागते. गेली अनेक वष्रे हा रुग्णवाहिका विभाग ही सेवा चोख बजावत आलेला आहे.
या इमारतीला डावीकडे सोडून फॅशन स्ट्रीटच्या दिशेला वळल्यावर काही पावलं चालत गेलो की, एक पडीक अवस्थेतील पाणपोई दिसते. एखाद्या छोटेखानी मंदिरासारख्या आकाराची ही वास्तू म्हणजे पाणपोई असेल, हे पहिल्यांदाच पटत नाही. मग त्या पडीक वास्तूवरील दगडातील एका फलकाकडे नजर जाते. ‘ही पाणपोई १९१३ मध्ये माधवदास लक्ष्मीदास कोठारी यांनी त्यांचे वडील लक्ष्मीदास जीवनदास कोठारी आणि आई नानीबाई यांच्या स्मरणार्थ बांधली असून घोडे आणि गुरं यांना पाणी पिण्यासाठी तिचा उपयोग व्हावा. ही पाणपोई बॉम्बे म्युनिसिपल कॉर्पोरेशनकडे सुपूर्द केली जात आहे’ या फलकातील मजकूर वाचल्यानंतर एक गोष्ट प्रकर्षांने लक्षात येते की, मुंबईत एके काळी घोडे आणि गुरे यांना पाणी पिण्यासाठी पाणपोई बांधण्यात आली होती. आणखी एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे मेट्रोपासून चर्नीरोड स्टेशन काही अंतरावरच आहे. पूर्वी चर्नीरोड म्हणजे गुरांना चरण्यासाठीची जागा होती, असे म्हणतात. त्यामुळे मेट्रोसमोर गुरांसाठी पाणपोई उघडण्यामागील कारण स्पष्ट होतं. त्याचप्रमाणे सुरुवातीच्या काळात म्हणजेच मुंबईत विद्युतीकरण होण्याआधी घोडय़ांची ट्राम धावत होती. म्हणजे घोडे ट्राम ओढायचे. त्यांच्यासाठीही ही नक्कीच सोय असणार.
सध्या ही पाणपोई अशीच पडून आहे. या पाणपोईच्या बाजूला स्वतंत्र भारतात तयार झालेली आणखी एक पाणपोई आहे. या दोन्ही पाणपोई सध्या बंदच आहेत. २०१४मध्ये पालिकेने फॅशन स्ट्रीटच्या सौंदर्यीकरणाचा प्रस्ताव ठेवला होता. अद्याप त्याबाबत पुढे काहीही झालेलं नाही. त्यामुळे या पाणपोई काय किंवा आझाद मदानाच्या परिघावरील अन्य खुणा काय, अजूनही धूळ खात पडल्या आहेत. इतिहासाच्या नावाने गळे काढणाऱ्या राजकीय पक्षांनाही या इतिहासाच्या खुणांबाबत काहीच पडलेली नाही. मुंबईतील या ऐतिहासिक खुणांचा मराठय़ांच्या इतिहासाशी काहीच संबंध नाही, म्हणूनही असेल कदाचित!
रोहन टिल्लू @rohantillu
tohan.tillu@expressindia.com