बंगळूरु : मुंबई : किफायतशीर दरात विमानसेवा देणारी कंपनी गो-फस्र्टचे विमान ५५ प्रवाशांना न घेताच बंगळूरुहून दिल्लीला गेल्याचे समोर आले आहे. सोमवारी घडलेली ही घटना उजेडात आल्यानंतर नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) कंपनीला नोटीस बजावली आहे. दरम्यान, कंपनीने आपली चूक मान्य करताना प्रवाशांची माफी मागितली आहे.
सोमवारी गो-फस्र्ट कंपनीचे ‘जी८-११६’ हे बंगळूरु-दिल्ली विमान विमानतळावरील प्रवाशांना न घेताच रवाना करण्यात आले. याबाबत तक्रार प्राप्त झाल्यानंतर डीजीसीएने केलेल्या प्राथमिक चौकशीत अनेक पातळय़ांवर चुका झाल्याचे समोर आले आहे. योग्य संवादाचा आभाव, समन्वय नसणे अशा गोष्टींमुळे ही टाळता येण्यासारखी घटना घडल्याचे डीजीसीएने म्हटले आहे. कंपनीला उत्तर देण्यासाठी दोन दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे.
दुसरीकडे कंपनीने मुंबईतून जारी केलेल्या निवेदनात झाल्या घटनेबाबत प्रवाशांची माफी मागण्यात आली आहे. हा प्रकार लक्षात आल्यानंतर सर्व प्रवाशांना अन्य विमानांमधून दिल्लीला पाठविल्याचे कंपनीने म्हटले आहे. तसेच या सर्व प्रवाशांना पुढील १२ महिन्यांमध्ये कोणत्याही देशांतर्गत प्रवासासाठी एक विमान तिकीट मोफत देण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.