मुंबई : गोव्यात भाजपला निम्म्या जागा मिळाल्या असल्या तरीही अनेक अपक्ष आमच्या संपर्कात आहेत. आम्ही महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षासह त्यांनाही बरोबर घेऊन सरकार स्थापन करणार असल्याचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि भाजपचे गोव्याचे निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी येथे सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जनतेचा असलेला दृढ विश्वास आणि मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या सरकारने केलेल्या कामामुळे गोव्यात भाजपला यश मिळाल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले. काँग्रेसला आत्मचिंतनाची गरज असून शिवसेनेची लढाई भाजपशी नाही, नोटाह्णशी आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.
गोव्यातील जनतेला विजयाचे श्रेय देऊन फडणवीस म्हणाले, सरकारविरोधातील जनभावनेचा (अँटी इन्कबन्सी फॅक्टर) परिणाम होऊन जनता भाजपला नाकारेल, असा भ्रम विरोधकांना होता. पण सरकारने केलेल्या कामाची पावती म्हणून जनतेने भाजपला भरभरून मते दिली आहेत. सावंत यांच्या डबल इंजिन सरकारने विकास व पायाभूत सुविधांची कामे केली आणि राज्यहिताचे अनेक निर्णय घेतले. गेल्या सात वर्षांत भाजप सरकारने केलेल्या कामाला जनतेने प्रतिसाद दिला आहे. मुख्यमंत्री सावंत आणि प्रदेश पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या कामामुळे हा विजय मिळाला आहे. पुढील पाच वर्षे गोवा विकास व समृद्धीच्या मार्गावर वाटचाल करेल.
बाबूश मोन्सेरात यांचा विजय होणार, अशी आम्हाला खात्री होती. पण उत्पल पर्रिकर पराभूत झाल्याचा मला आनंद नाही. ते भाजप परिवारातील असून त्यांनी योग्य निर्णय घेतला असता, तर आज ते आमदार असते, असे फडणवीस यांनी नमूद केले.
पन्नासवर सभा
गोव्याचे निवडणूक प्रभारी म्हणून भाजपने जबाबदारी दिलेल्या फडणवीस यांनी मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल आदी राज्यांमध्येही जाऊन पक्षाचा प्रचार केला आहे. पक्षाचे निवडणूक प्रभारी म्हणून बिहारची जबाबदारी पहिल्यांदा मिळाली होती, तेव्हा भाजपच्या जागा वाढल्या होत्या. गोव्याचे प्रभारी म्हणून जबाबदारी मिळाल्यावर लगेच मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि इतर पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून रणनीती आखली. गोव्यातील भाजप उमेदवारांची निवड, अन्य पक्षांतून भाजपमध्ये कोणत्या नेत्यांना घ्यायचे व उमेदवारी द्यायची, अशा साऱ्या बाबींमध्ये फडणवीस यांनी निर्णय प्रक्रियेत महत्त्वाची जबाबदारी पार पाडली. उमेदवारी न मिळाल्याने पक्षातील नेत्यांची काही नेत्यांची नाराजी आणि धुसफुस यातून भाजपला नुकसान होणार नाही, याची काळजी घेतली. प्रचारयंत्रणा प्रभावीपणे राबविताना प्रत्येक मतदारसंघातील महत्त्वाचे विषय, दररोजच्या घडामोडी व प्रचाराची अद्ययावत माहिती फडणवीस दररोज घेत होते व स्वत: ५० हून अधिक सभा घेतल्या. गोवा प्रदेश सुकाणू समितीच्या आणि केंद्रीय पातळीवर पक्षाच्या नेत्यांच्या होणाऱ्या बैठकांमध्ये फडणवीस सहभागी होते.