मुंबई : उन्हाळ्याच्या सुट्ट्यानिमित्त बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी वाढली आहे. नियमित प्रवाशांसह नवख्या प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी एक विशेष रेल्वेगाडी चालवण्यात येणार आहे. गोव्यामधील वास्को द गामा येथून ते बिहारमधील मुझफ्फरपूर येथे साप्ताहिक एक्स्प्रेस चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या रेल्वेगाडीला कल्याण, पनवेल, रोहा, चिपळूण, रत्नागिरी, सावंतवाडी रोड येथे थांबा असल्याने कोकणवासियांसाठी ही रेल्वेगाडी फायदेशीर ठरणार आहे.
गाडी क्रमांक ०७३११/०७३१२ वास्को द गामा – मुझफ्फरपूर – वास्को द गामा साप्ताहिक विशेष एक्स्प्रेस धावणार आहे. गाडी क्रमांक ०७३११ वास्को द गामा ते मुझफ्फरपूर ७ एप्रिल ते २ जूनपर्यंत दर सोमवारी वास्को द गामा येथून साप्ताहिक विशेष एक्स्प्रेस दुपारी ४ वाजता सुटेल. ही रेल्वेगाडी तिसऱ्या दिवशी दुपारी १२.३० वाजता मुझफ्फरपूर जंक्शनला पोहोचेल. गाडी क्रमांक ०७३१२ मुझफ्फरपूर जंक्शन ते वास्को द गामा साप्ताहिक विशेष एक्स्प्रेस १० एप्रिल ते ५ जूनपर्यंत दर गुरुवारी मुझफ्फरपूर जंक्शनहून दुपारी २.४५ वाजता सुटेल. ही रेल्वेगाडी तिसऱ्या दिवशी दुपारी २.५५ वाजता वास्को द गामा येथे पोहोचेल.
या रेल्वेगाडीला मडगाव, थिवि, सावंतवाडी रोड, रत्नागिरी, चिपळूण, रोहा, पनवेल, कल्याण, मनमाड, भुसावळ, खांडवा जंक्शन, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, माणिकपूर, प्रयागराज, पं. दीनदयाल उपाध्याय, बक्सर, आरा, दानापूर, पाटलीपुत्र आणि हाजीपूर येथे थांबेल. या रेल्वेगाडीला एकूण २० एलएचबी डबे असतील. यात द्वितीय श्रेणी वातानुकूलित एक डबा, तृतीय श्रेणी वातानुकूलित पाच डबे, शयनयान १२ डबे, जनरेटर कार एक, एसएलआर एक अशी संरचना असेल, अशी माहिती कोकण रेल्वे प्रशासनाने दिली.
आजपासून मडगाव ते लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष रेल्वेगाडी सुरू
गाडी क्रमांक ०११०४/०११०३ मडगाव ते लोकमान्य टिळक टर्मिनस ते मडगाव जंक्शन साप्ताहिक विशेष रेल्वेगाडी धावेल. गाडी क्रमांक ०११०४ मडगाव ते लोकमान्य टिळक टर्मिनस साप्ताहिक विशेष रेल्वेगाडी ६ एप्रिल ते ४ मे पर्यंत दर रविवारी सायंकाळी ४.३० वाजता मडगाव जंक्शन येथून निघेल. ही रेल्वेगाडी दुसऱ्या दिवशी सकाळी ६.२५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल.
गाडी क्रमांक ०११०३ लोकमान्य टिळक टर्मिनस ते मडगाव साप्ताहिक विशेष रेल्वेगाडी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून ७ एप्रिल ते ५ मे पर्यंत दर सोमवारी सकाळी ८.२० वाजता सुटेल आणि मडगाव येथे रात्री ९.४० वाजता पोहोचेल. या रेल्वेगाडीला करमळी, थिवि, सावंतवाडी रोड, कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, वैभववाडी रोड, राजापूर रोड, विलवडे, आडवली, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, चिपळूण, खेड, माणगाव, रोहा, पेण, पनवेल आणि ठाणे स्थानकावर थांबेल.