मुंबई : देश-विदेशात नावलौकिक मिळवलेला निखिल महाजन दिग्दर्शित ‘गोदावरी’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांना ‘जिओ सिनेमा’ या ओटीटी वाहिनीवर पाहता येणार आहे. ‘गोदावरी’ या चित्रपटाची घोषणा २०२२ मध्ये झाल्यापासून महाराष्ट्रासह सर्वत्र हा चित्रपट चर्चेचा विषय ठरला होता. आता हा चित्रपट प्रेक्षक शनिवार, ३ जून पासून जिओ सिनेमावर घरबसल्या बघू शकणार आहेत.
इफ्फी महोत्सव, न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिव्हल, वॅनकोवर इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल, न्यूझीलंड इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल, पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, एफआयपीआरईएससीआय – इंडिया ग्रँड प्रिक्स, तसेच शांघाई को-ऑपरेशन ऑर्गनायजेशन आदी अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘गोदावरी’ने आपली मोहोर उमटवली आहे. गेल्यावर्षी महाराष्ट्रात सर्वाधिक पुरस्कार पटकवणाऱ्या या मराठी चित्रपटात जितेंद्र जोशी, नीना कुळकर्णी, संजय मोने, प्रियदर्शन जाधव, गौरी नलावडे आणि विक्रम गोखले यांच्या प्रमुख भूमिका आहेत.जिओ स्टुडिओज प्रस्तुत, ज्योती देशपांडे, ब्लू ड्रॉप फिल्म्स, जितेंद्र जोशी पिक्चर्सची निर्मिती असून ‘गोदावरी’चे दिग्दर्शन निखिल महाजन यांनी केले आहे.
हेही वाचा >>>मुंबईत मे महिन्यात साडेनऊ हजारांहून अधिक घरांची विक्री
‘अनेकदा असे होते की एखादी गोष्ट साध्य करण्याच्या नादात आपण अनेक जवळच्या गोष्टी, नाती मागे सोडतो आणि त्याच मौल्यवान नात्यांची किंमत जाणवून देणारा हा चित्रपट आहे. नात्यांचे महत्त्व अधोरेखित करणारा असा हा ‘गोदावरी’ सिनेमा ‘जिओ सिनेमा’वर प्रदर्शित होत आहे. त्या निमित्ताने जगभरातील मराठी प्रेक्षकच नव्हे तर सगळेच सिनेप्रेमी हा चित्रपट पाहू शकतील याचा मला आनंद आहे’, अशी भावना दिग्दर्शक निखिल महाजन यांनी व्यक्त केली.
हेही वाचा >>>मुंबई: दादासाहेब फाळके चित्रनगरीतील निर्मिती संस्थासाठी ‘स्वच्छतेची मार्गदर्शक नियमावली’ जाहीर
‘प्रत्येक कुटुंबाला जोडणारा हा चित्रपट आहे. आयुष्यात कुटुंब, नाती किती महत्त्वाची असतात, याची शिकवण देणारा हा चित्रपट आता जिओ सिनेमावर प्रदर्शित होत आहे. त्यामुळे जगभरातील प्रेक्षक घरबसल्या आपल्या कुटुंबासोबत चित्रपट पाहू शकतील याचा मला विशेष आनंद आहे’, असे अभिनेता जितेंद्र जोशी यांनी सांगितले.