मुंबई : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या भूसंपादन प्रक्रियेला गोदरेज ॲण्ड बॉईसी कंपनीने केलेला विरोध, त्यांनी संपादन प्रक्रियेत निर्माण केलेेले अनावश्यक अडथळे यामुळे हा प्रकल्प रखडल्याचा आरोप राज्य सरकारने मंगळवारी उच्च न्यायालयात केला. बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी जमीन संपादित करण्याच्या राज्याच्या आदेशाला आव्हान देणाऱ्या गोदरेजच्या याचिकेला विरोध करणारे प्रतिज्ञापत्र राज्य सरकारतर्फे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी आणि सरकारी वकील ज्योती चव्हाण यांनी मंगळवारी न्यायमूर्ती नितीन जामदार आणि न्यायमूर्ती शर्मिला देशमुख यांच्या खंडपीठासमोर दाखल केले. त्यात राज्य सरकारने हा आरोप केला. संपादन प्रक्रियेस विलंब होण्यात कंपनीचा मोठा वाटा होता हे स्पष्ट आहे.

बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी संपादित केलेल्या १० हेक्टर जमिनीकरिता २६४ कोटी रुपये नुकसानभरपाई निश्चित करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला कंपनीने उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. त्यात बुलेट ट्रेन प्रकल्पामुळे होणाऱया सामाजिक बदलांचा तज्ज्ञांकडून अभ्यास करण्यात आलेला नाही, असा आक्षेप कंपनीने घेतला आहे. ही अट दूर सारण्यासाठी कायद्यात दुरूस्ती करण्यात आल्याचा दावाही कंपनीने केला आहे.

सामाजिक बदलांचा अभ्यास करण्याच्या अटीचा गैरफायदा घेऊ नये यासाठी खबरदारी म्हणून भूसंपादन कायद्यात दुरूस्ती करण्यात आली, असे सरकारने प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. तसेच कंपनीने अधिग्रहण प्रक्रियेच्या प्रत्येक टप्प्यावर अनावश्यक अडथळे निर्माण करण्यासाठी कोणतीही कसर सोडली नाही. परिणामी प्रकल्प रखडून त्याची किंमत एक हजार कोटी रुपयांहून अधिक वाढली असून राज्याच्या तिजोरीला अतिरिक्त कोट्यवधी रुपये खर्च करावे लागला. तसेच कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले, असा दावाही राज्य सरकारने केला आहे. राज्य सरकारकडून बुलेट ट्रेन प्रकल्पाला ‘महत्वाचा पायाभूत सुविधा प्रकल्प’ म्हणून घोषित करण्यात आला आहे. तथापि, भूसंपादनासाठी सौहार्दपूर्ण ठराव करण्याच्या प्रयत्नात एक वर्षाचा कालावधी वाया गेल्याचेही सरकारने म्हटले आहे.

दरम्यान, मंगळवारी झालेल्या सुनावणीच्या वेळी ५३४ किमी लांबीचा आणि ठाणे खाडीतून जाणारा हा प्रकल्प डिसेंबर २०२३ मध्ये सुरू करण्याचा प्रस्ताव आहे. त्यामुळे जनहितासाठी प्रकल्पाचे काम पुढे चालू ठेवता यावे म्हणून नुकसानभरपाईची २६४ कोटी रुपयांची रक्कम संबंधित प्राधिकरणाकडे जमा करण्यात आल्याचे राज्य सरकारतर्फे न्यायालयाला सांगण्यात आले.