मुंबई : सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर गुरुवार आणि शुक्रवारी केलेल्या दोन वेगवेगळ्या कारवाईत १.२५७ किलो सोने आणि ३० किलो चरस जप्त केले. रस अल – खैमाह येथून सोने आणि बॅंकॉकहून चरस, गांजाची तस्करी करण्यात आली होती. या प्रकरणी सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी सहा प्रवाशांना अटक केली. जप्त करण्यात आलेल्या सोन्याची किंमत सुमारे ९१ लाख रुपये, तर चरस आणि गांजाची किंमत अनुक्रमे ३० कोटी रुपये आणि ११ कोटी रुपये आहे.
हेही वाचा – मुंबई : तापमानात घट होण्याची शक्यता
मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावर रस अल – खैमाह येथून आलेल्या एका प्रवाशाला सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी अडवले. या प्रवाशाची तपासणी केली असता त्यांच्याकडे मेणात दडवलेली २४ कॅरेट सोन्याची भुकटी आणि २४ कॅरेट सोन्याच्या १.२५७ किलोग्रॅम वजनाच्या साखळ्या सापडल्या. त्यांची किंमत सुमारे ९१ लाख रुपये आहे. प्रवाशाने हे सोने मोजे आणि बूटांमध्ये लपवले होते. याप्रकरणी एका प्रवाशाला अटक करण्यात आली. बॅंकॉक येथून आलेल्या तीन प्रवाशांना सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी विमानतळावर अडवले आणि त्यांची तपासणी केली. या प्रवाशांकडून ११ किलो गांजा जप्त करण्यात आला असून त्याची किंमत सुमारे ११ कोटी रुपये आहे. प्लॅस्टिकच्या वेष्टनात लपवलेले हे अंमली पदार्थ ट्रॉली बॅगमध्ये सापडले. याप्रकरणी सदर प्रवाशाला अटक करण्यात आली. तसेच बॅंकॉक येथून आलेल्या आणखी दोन प्रवाशांची सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता त्यांच्याकडे १८ किलो चरस सापडले. जप्त केलेल्या चरसची किंमत सुमारे १८ कोटी रुपये आहे. सदर दोन प्रवाशांना अटक करण्यात आली. याचबरोबर मुंबईहून दुबईला जाणाऱ्या दोन प्रवाशांना सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी रोखले आणि त्यांच्याकडील २० हजार युरो म्हणजेच १७.४६ लाख रुपये जप्त केले.