या वर्षीच्या अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त सुवर्णकारांचा उत्साह वाढविणारा ठरला असून देशभरात सोनेविक्रीत २५ टक्क्यांनी वाढ झाल्याचे सुवर्णउद्योग क्षेत्रातील सूत्रांकडून सांगण्यात आले. मुंबईत गेल्या तीन वर्षांचा निरुत्साह लोपला असून सुवर्णविक्रीने मोठी झेप घेतली.
जीएसटी आणि नोटाबंदीचा मोठा फटका सुवर्णविक्री व्यवसायाला जाणवत होता. मात्र २०१६नंतरची विक्रीझळाळी लाभलेली ही पहिली अक्षय्य तृतीया ठरली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत सोन्याचा दर सात टक्क्य़ांनी कमी झाला असून तो ३२ हजार रुपये दहा ग्रॅम एवढा झाला आहे.
वाढता उष्मा आणि आडदिवस असूनही सकाळपासून दुकानांमध्ये लोकांची गर्दी उसळत होती. कित्येकांनी आधीच नोंदणी केलेले दागिने मंगळवारच्या मुहूर्तावर विकत घेतले, तर काहींनी मुहूर्त साधण्यासाठी सोन्याचे नाणे विकत घ्यायला गर्दी केली होती. लग्नसराईचे दिवस असल्याने सोन्याच्या दागिन्यांची विक्री मोठय़ा प्रमाणात झाली. देशाच्या दक्षिण भागांत विक्रीचे प्रमाण सर्वोच्च होते, त्या खालोखाल उत्तर भारतात विक्री झाली.
पुण्यात दागिन्यांनाच पसंती
सोन्याची वेढणी विकत घेण्याचा ग्राहकांचा कल अलीकडच्या काळात कमी झाला आहे. वेढणी खरेदी करून नंतर त्याचे दागिने करताना ग्राहकांना दोन वेळा वस्तू आणि सेवा कर भरावा लागतो. त्यामुळे ग्राहक वेढण्यांऐवजी तयार दागिन्यांना पसंती देऊ लागले असून, वेढण्यांची खरेदी जवळपास १० ते २० टक्क्य़ांनी कमी झाली आहे.
नाशिकमध्ये पैठणीचीही भेट!
सुवर्णविक्रेत्यांनी दागिन्यांबरोबर पैठणी आणि अन्य विविध वस्तूंची खास भेट दिल्याने नाशिकमध्ये सोनेखरेदीचा उत्साह वाढला होता. जूनच्या दुसऱ्या आठवडय़ापर्यंत ही स्थिती कायम राहील. नंतर पुन्हा एकदा भाव वधारतील, असे विक्रेत्यांनी सांगितले. जळगावमध्येही सोन्याच्या दागिन्यांची मोठी विक्री झाली.