अनिश पाटील
डीआरआयने गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात परदेशातून आलेले सुमारे साडेआठ किलो सोने जप्त केले होते. पकडलेले तस्कर हे महाराष्ट्रातील आहेत. भारतात सोन्याची तस्करी म्हटले की, आखाती देशांचे नाव डोळय़ासमोर येते. आता म्यानमारमार्गे होणाऱ्या सोन्याच्या तस्करीने सर्वानाच मागे टाकले आहे. देशातील महसूल गुप्तचर संचालनालयाने २०२१-२२ मध्ये तस्करीच्या माध्यमातून भारतात आलेले सोने जप्त केले त्यापैकी ३७ टक्के सोने म्यानमारमधून भारतात आले होते. रेल्वे मार्गाने होणाऱ्या सोन्याच्या तस्करीतही वाढ झाली आहे.
तस्करीचे सोने भारतात विकण्यासाठी हवाला व्यवसायाप्रमाणे एक ते १० रुपयांच्या नोटांचा वापर केला जातो. या नोटा टोकन म्हणून वापरतात. डीआरआयने गेल्यावर्षी १४७३ कोटी रुपयांच्या सोन्याच्या तस्करीप्रकरणी रईस अहमद अक्केरी याला अटक केली होती. त्याच्या चौकशीत ही बाब उघड झाली. विश्वासातील सराफाला दूरध्वनी केल्यानंतर त्यांचा व्यवहार ठरायचा. त्यावेळी एक ते दहा रुपयांच्या एखादी नोटेचा क्रमांक या सराफाला देण्यात यायचा. विक्रीसाठी आलेला व्यक्तीला हा टोकन क्रमांक सांगितल्यानंतर त्याला सोने दिली जायचे. अन्यथा हा व्यवहार होत नसे.
झवेरी बाजारमधील एका सराफाला आरोपीच्या माध्यमातून १०० किलो सोने आरोपींनी विकले होते. त्याच्यापर्यंत आरोपी पोहचल्यानंतर त्याच्या मोबाइलमधील व्हॉट्सअॅप चॅट व संभाषणाच्या चित्रफितीवरून रईसकडे डीआरआयचे लक्ष वळले होते. त्यानंतर २९ जून २०१९ मध्ये रईसविरोधात डीआरआयने लुकआऊट सक्र्युलर काढले. त्यानंतर त्याला अटक केली होती. विशेष म्हणजे सोन्याच्या तस्करीसाठी अभियांत्रिकी क्षेत्रात शिक्षण घेणाऱ्या तरुणांचा वापर होत असल्याचे सुरक्षा यंत्रणांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. मुंबई विमानतळावर तीन वर्षांपूर्वी ११ किलो (सव्वातीन कोटी किमतीचे) सोने जप्त केले होते. त्याप्रकरणी एका अभियंत्याला अटक करण्यात आली होती.
माटुंग्यातील रहिवासी असलेला हा तरुण शुद्ध सोन्यापासून यंत्रांचे सुटे भाग तयार करून ते यंत्रांमध्ये बसवण्याचे काम करायचा. प्रत्येक भागासाठी त्याला २५ हजार रुपये मिळत असत. करोनाच्या काळात, म्हणजे २०२१-२२ अहवालानुसार भारतातील सोन्याच्या तस्करीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. गेल्यावर्षी तस्करीचे एकूण १६० गुन्हे उघडकीस आले. त्यापैकी ४०५.३५ कोटी रुपयांचे एकूण ८३३.०७ किलो सोने जप्त करण्यात आले होते. डीआरआयने २०२०-२१ आणि २०२१-२२ मध्ये जप्त केलेले बहुतेक सोने म्यानमारमधून तस्करी करण्यात आले होते. सर्वाधिक तस्करी मध्य-पूर्वेकडून होत असे. आता देशात सोन्याच्या तस्करीचा मार्ग बदलले आहेत.
करोनाकाळात आंतरराष्ट्रीय उड्डाणे बंद होती. त्यामुळे कुरिअरद्वारे सोन्याची तस्करी वाढली. बहुतांश सोने म्यानमारमार्गे भारतात पोहोचले. म्यानमारच्या सीमेला लागून असलेल्या मणिपूरचा तमू-मोरेह-इंफाळ हा मार्ग आणि मिझोरामचा जोखटवार मार्गे देशातील सर्वाधिक सोन्याची तस्करी होते. त्याचे प्रमुख कारण म्हणजे म्यानमारहून भारतात सोन्याची तस्करी करणे तुलनेने सोपे आहे. भारतातून म्यानमारच्या पाच किलोमीटर आत जाण्यावर कोणतेही बंधन नाही. फक्त ओळखपत्र असणे आवश्यक आहे. ओळखपत्र दाखवून म्यानमारमध्ये जाऊन वस्तूंची खरेदी करून लोक अगदी सहज परततात. सोन्याच्या तस्करीत गुंतलेल्या टोळय़ा याचा फायदा घेतात. म्यानमारमध्ये बसलेले तस्कर भारतात सोने पुरवतात किंवा इथल्या टोळय़ा म्यानमारमधून सोने आणतात. विमानतळ व बंदरांच्या तुलनेत म्यानमार सीमेवर कमी तपासणी होते. भारतात होणाऱ्या सोने तस्करीचे केंद्र दुबई होते. वर्षांनुवर्षे भारतात दुबईतूनच सोन्याची तस्करी होत होती. पण वर्षांनुवर्षे त्याच्या मार्गामध्ये बदल होत आहेत. सोन्याच्या तस्करीच्या या आंतरराष्ट्रीय टोळय़ांमध्ये भारतीय तस्करांसह अनेक देशांतील टोळय़ांचा समावेश आहे. दक्षिण आफ्रिका, स्वित्झर्लंड आणि ऑस्ट्रेलियातून सोने दुबईला आयात केले जाते. हे सोने छुप्या पद्धतीने विविध देशांतून भारतात पाठवले जाते. दिल्ली, मुंबई आणि कोलकता येथील टोळय़ा दुबईच्या आंतरराष्ट्रीय सिंडिकेटचा भाग बनून कोटय़वधींचा नफा कमवत आहेत. देशात जप्त करण्यात आलेल्या बेकायदा सोन्यापैकी २० टक्के सोने मध्य-पूर्वेतील आखाती देशांतून आले आहे. तस्करीचे ७ टक्के सोने बांगला देशमार्गे भारतात पोहोचले. त्याचप्रमाणे ३६ टक्के सोने इतर देशांतून तस्करीच्या माध्यमातून आल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.