सुमारे २६ लाख रुपयांच्या सोन्याची तस्करी करण्याच्या स्वतंत्र घटनांमध्ये श्रीलंका आणि इराण या देशांतील दोन महिलांना सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी शुक्रवारी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर अटक केली.  यातील इराणी महिलेने इराणी पावांच्या पाकिटांमध्ये सोने लपविले होते.
फराहनाज घोलामहोसेन दहमार्देह घालेहनू (इराण) आणि समसिया महमुदू लिबी (श्रीलंका) अशी या दोन महिलांची नावे आहेत. इराणी विमानसेवेने मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल झालेल्या फराहनाज हिने विमानतळावरील ‘ग्रीन चॅनल’ कुठल्याही अडथळ्याशिवाय पार केले. वास्तविक आपल्याकडे काहीच वस्तू नसल्याचे जाहीर करणाऱ्या प्रवाशांना या ‘ग्रीन चॅनल’मधून जाण्यास सांगितले जाते. परंतु ती विमानतळाच्या २बी आगमन सभागृहात पोहोचली. तेव्हा तिच्या संशयित वागण्याची सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी दखल घेतली.तिच्या सामानातून ३९९.७८ ग्रॅमचे १०.६९ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने सापडले. हे दागिने तिने इराणी पावांच्या पाकिटांमध्ये तसेच हातात घेतलेल्या जाकिटाच्या पाकिटांमध्ये लपवून ठेवले होते. हे दागिने ताब्यात घेऊन या महिलेला नंतर अटक करण्यात
आली.
दुसऱ्या घटनेमध्ये, समसिया ही कोलंबोहून मुंबईत दाखल झाली. तिला विमानतळाच्या बाहेर पडण्याच्या प्रवेशद्वाराजवळून अटक करण्यात आली. तिच्याकडून ५८७.७ ग्रॅमचे १५.७१ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने सापडले.