मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावर महसूल गुप्तवार्ता संचलनालयाने (डीआरआय) शनिवारी केलेल्या कारवाईत साडेतीन किलो सोने जप्त केले. अबुधाबी येथून या सोन्याची तस्करी करण्यात आली होती. याप्रकरणी डीआरआयने दोन कर्मचाऱ्यांना अटक केली. जप्त करण्यात आलेल्या सोन्याची किंमत सुमारे पावणेतीन कोटी रुपये आहे.
हेही वाचा – देशातील पक्ष्यांच्या संख्येत लक्षणीय घट; जाणून घ्या, मानवी चुका किती हानीकारक
अबुधाबी येथून मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावर येणाऱ्या विमानातून सोने आणण्यात येणार असल्याची माहिती डीआरआयला मिळाली होती. त्यानुसार डीआरआयने शनिवारी विमानतळावर सापळा रचला होता. विमानतळावरून दोन कर्मचाऱ्यांना सोन्यासह ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून ३५०२ ग्रॅम सोने जप्त करण्यात आले असून त्याची किंमत दोन कोटी ६७ लाख ४९ हजार ७८० रुपये आहे. आरोपींकडून उपाहारगृहात सोने स्वीकारण्यासाठी एक व्यक्ती येणार होती. पण त्यापूर्वीच त्यांना अटक झाली. ताब्यात घेण्यात आलेले आरोपी विमातळावर सुविधा पुरवणाऱ्या कंपनीतील कर्मचारी असल्याचे सूत्रांनी सांगितले. याप्रकरणी डीआरआय अधिक तपास करीत आहे.