मुंबई : मुंबईत रेबीजची लागण होऊन तीन सोनेरी कोल्ह्यांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच नवी मुंबईतील खारघर येथे सोनेरी कोल्हा आणि भटके कुत्रे एकत्र वावरताना दिसून आले आहेत. त्यामुळे सोनेरी कोल्ह्यांचा अधिवास आणि संरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
खारघरमधील वास्तू-विहार परिसरात ‘खारघर वेटलॅण्ड अॅण्ड हिल्स’च्या महिला सदस्य तसेच छायाचित्रकार सीमा टॅंक यांनी दोन दिवसांपूर्वी सोनेरी कोल्हा आणि भटके कुत्रे एकत्र वावरतानाची ध्वनिचित्रफित प्रसारित केली होती. यापूर्वीही भटके कुत्रे आणि सेनेरी कोल्हा एकत्र असल्याच्या घटना घडल्या आहेत.
हेही वाचा >>>कर्नाक पूल जूनमध्ये सुरु होणार; पुलाच्या कामाची अतिरिक्त आयुक्तांनी केली पाहणी
दरम्यान, सोनेरी कोल्हा आणि भटके कुत्रे एकत्रित येणे ही धोक्याची घंटा असून यामुळे कोल्हा आणि कुत्रा यांच्या संकरातून नवी प्रजाती जन्माला येण्याचा धोका आहे. असे झाल्यास ते सर्वांसाठीच घातक ठरू शकते. खारघरच्या आसपास पाणथळ आणि कांदळवन क्षेत्र असल्याने तेथे सोनेरी कोल्ह्यांचा अधिवास आहे. मात्र, सरकारने आजतागायत सोनेरी कोल्ह्यांचे सर्वेक्षण आणि संरक्षणासाठी कोणत्याही ठोस उपाययोजना केलेल्या नाहीत. कांदळवन हा कोल्ह्यांसाठी सुरक्षित अधिवास आहे. आजही नवी मुंबईतील कांदळवन परिसरात सोनेरी कोल्हा आढळतो. मात्र, त्याबाबत त्यांच्या संवर्धनासाठी कोणत्याही उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. त्यापूर्वीही खारघरमध्ये सोनेरी कोल्ह्याचा मृतदेह आढळून आला होता. दरम्यान, मुंबईत रेबीजची लागण होऊन तीन सोनेरी कोल्ह्यांचा झालेल्या मृत्यूची घटना ताजी असतानाच सोनेरी कोल्हा आणि भटके कुत्रे यांच्या संकरातून नवी प्रजाती तयार होऊ शकते अशी भिती अभ्यासकांकडून व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा >>>टिपू सुलतानची जयंती साजरी करण्यावर बंदी आहे का ? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला प्रश्न
वाइल्डलाइफ कॉन्झर्व्हेशन सोसायटी इंडिया आणि मॅन्ग्रुव्ह फाउंडेशनने डिसेंबर २०२२ ते जुलै २०२३ या कालावधीत सोनेरी कोल्ह्यांचा अभ्यास केला आहे. या अभ्यासाच्या अहवालात मुंबईत कोल्हा आणि कुत्र्यांच्या संकराच्या पहिल्या संशयित प्रकरणाची नोंद केली गेली आहे. त्यामुळे हे भविष्यात आव्हानात्मक ठरु शकते अशी शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. तसेच या अभ्यासात कोल्ह्यांच्या आहारात प्लास्टिकचे कणही आढळून आले आहेत. मुंबईतील कांदळवन क्षेत्राचे जतन करण्यासाठी ठोस उपाययोजना आवश्यक असल्याचे या अभ्यासातून समोर आले आहे.
सोनेरी कोल्हा आणि कुत्रे एकत्रित वावरणे हे धोकादायकच आहे. यामुळे हायब्रिड तयार होण्याची शक्यता अधिक आहे. आम्ही जेव्हा हा अभ्यास केला तेव्हा यामध्ये प्रामुख्याने आम्हाला कुत्रे आणि कोल्हे एकत्रितपणे दिसून आले आहेत. त्यांच्या सीमा सारख्या होत्या.-निकित सुर्वे, वन्यजीव संशोधक
कोल्ह्यांचा अधिवासच संरक्षित नसेल तर अशा घटना सतत घडत राहतील. ज्या भविष्यात धोका निर्माण करणाऱ्या असतील. यासाठी त्यांचा अधिवास सुरक्षित असणे महत्त्वाचे आहे.-सीमा टॅंक, सदस्य, खारघर वेटलॅण्ड अॅण्ड हिल्स