* महापालिका बांधणार २८ हजार घरे * अर्थसंकल्पात १८०० कोटींची तरतूद
महापालिकेचे ‘स्वच्छ आणि सुंदर मुंबई’ हे ब्रीद खरे ठरवण्यासाठी रात्रंदिवस राबणाऱ्या सफाई कामगारांसाठी मुंबई महापालिकेने २८ हजार घरे बांधण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी २०१३-१४च्या अर्थसंकल्पात १८०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात येणार आहे. टप्प्याटप्प्याने ही घरे बांधण्यात येणार आहेत.
राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे सदस्य श्यौराज जीवन यांनी मंगळवारी महापालिकेस भेट दिली. सफाई कामगारांना देण्यात येणाऱ्या सुविधांबाबत त्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांशी चर्चा केली. यानंतर अतिरिक्त आयुक्त मोहन अडतानी यांच्याबरोबर संयुक्त पत्रकार परिषद घेऊन घरांचे ‘शुभ वर्तमान’ सफाई कामगारांना देण्यात आले. मुंबईमधील सफाई कामगार आज अत्यंत हालाखीच्या परिस्थितीत काम करीत आहे. त्यांना आरोग्याचे प्रश्न भेडसावत आहेत. या सर्व पाश्र्वभूमीवर कामगारांसाठी घरे बांधून देण्याचा निर्णय घेण्यात आला. टप्प्याटप्प्याने बांधण्यात येणाऱ्या या घरांसाठी २०१३-१४ च्या अर्थसंकल्पात १८०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात येणार असल्याची माहिती मोहन अडतानी यांनी यावेळी दिली.
पालिकेच्या सेवेतून दर महिन्याला २०० ते २५० सफाई कामगार निवृत्त होत आहेत. निवृत्त कामगारांच्या वारसाला तीन महिन्यांमध्ये अनुकंपा तत्वावर पालिका सेवेत नोकरी दिली जाते. सध्या अनुकंपा तत्वावर सादर करण्यात आलेले ४५९ अर्ज प्रलंबित असून लवकरच ते निकालात काढण्यात येतील, असेही अडतानी यांनी यावेळी स्पष्ट केले. पालिका प्रशासनाकडून सफाई कामगारांना दिल्या जाणाऱ्या सुविधांबाबत श्यौराज जीवन यांनी समाधान व्यक्त केले. मात्र, सफाई कामगारांच्या संघटनांच्या प्रतिनिधींनी आपली भेट न घेतल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा