मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांतील पाणीसाठय़ात दररोज मोठी वाढ होते आहे. गेल्या शनिवारी ६.४९ टक्क्यांपर्यंत खालावलेला येथील पाणीसाठा आठच दिवसांत १२.८५ टक्क्यांवर पोहोचला. सध्या धरणक्षेत्रात संततधार सुरू असून तेथे दररोज १०० ते १५० मिमी पावसाची नोंद होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

यंदा पावसाळा लांबल्यामुळे आणि प्रचंड उष्णतेमुळे धरणांमधील पाणीसाठा खूपच खालावला होता. जूनच्या तिसऱ्या आठवडय़ापर्यंत पाऊस न पडल्यामुळे २५ जून रोजी धरणांमध्ये ६.४९ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. मात्र, जूनच्या चौथ्या आठवडय़ात सुरू झालेल्या दमदार पावसामुळे पाणीसाठय़ात वाढ होऊ लागली.  गेल्या आठ दिवसांत पडलेल्या पावसाने पाणीसाठय़ात भरघोस वाढ झाली असून पाणीसाठा १२.८५ टक्क्यांवर पोहोचला. धरणक्षेत्रात दमदार पाऊस पडत असून दररोज १०० ते १५० मिमी पावसाची नोंद होते आहे. तसेच मुंबईच्या हद्दीतील विहार आणि तुळशी धरणांमध्ये समाधानकारक पाऊस पडत आहे.

सात धरणांचा आधार.. उध्र्व वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुळशी या सात धरणांतून मुंबईला दर दिवशी ३८०० दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे. या तलावांत वापरायोग्य पाणी साठवणुकीची क्षमता १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर आहे. धरणांमध्ये १ ऑक्टोबर रोजी १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर पाणीसाठा उपलब्ध असल्यास पुढील वर्षभर मुंबईकरांना सुरळीत आणि मुबलक पाणीपुरवठा करणे महानगरपालिकेला शक्य होते.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Good rains dam area water stock in 7 mumbai reservoirs rise daily due to rain mumbai print news zws