लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या २०३० घरांच्या सोडतीच्या अर्ज विक्री-स्वीकृतीला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. अर्ज विक्री-स्वीकृती प्रक्रियेची मुदत संपुष्टात येण्यासाठी काही तास शिल्लक असताना एक लाखाहून अधिक इच्छुकांनी अर्ज सादर केले आहेत. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा घरांची संख्या कमी असताना, महागड्या घरांची संख्या अधिक असतानाही अर्ज विक्री-स्वीकृतीचे प्रमाण समाधानकारक आहे. आतापर्यंत एक लाखांहून अधिक इच्छुकांनी अर्ज भरले आहेत. यापैकी ७९ हजारांहून अधिक इच्छुक अर्जदारांनी अनामत रक्कमेसह अर्ज सादर केले आहेत.

मुंबई मंडळाच्या बोरिवली, गोरेगाव, जुहू, दादर, वरळी, वडाळा, ताडदेव, विक्रोळी, पवई आदी ठिकाणच्या २०३० घरांच्या सोडतीसाठी ९ ऑगस्टपासून अर्ज विक्री-स्वीकृतीस सुरुवात झाली. अत्यल्प, अल्प, मध्यम आणि उच्च अशा चारही उत्पन्न गटांतील घरांचा समावेश असलेल्या या सोडतीच्या अर्ज विक्री-स्वीकृती प्रक्रियेस केवळ २६ दिवसांचा कालावधी देण्यात आला होता. पुनर्विकासाद्वारे उपलब्ध झालेल्या सोडतीतील घरांच्या किंमती भरमसाठ होत्या. परिणामी, सोडतीला प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे मुंबई मंडळावर टीका होत होती. म्हाडा प्राधिकरणाने अखेर २८ ऑगस्ट रोजी अर्ज विक्री-स्वीकृतीची मुदत १५ दिवसांनी वाढवली. त्यानुसार अर्ज भरण्याची आणि अनामत रक्कमेसह अर्ज सादर करण्याची मुदत १९ सप्टेंबर रोजी संपुष्टात येणार आहे. मुदत संपुष्टात येण्यासाठी आता केवळ काही तास शिल्लक आहे. दरम्यान, महागड्या घरांचा समावेश असलेल्या सोडतीस कमी प्रतिसाद मिळेल असे वाटत होते. मात्र सोडतीला चांगला प्रतिसाद मिळात आहे.

आणखी वाचा-Mumbai Ganesh Visarjan 2024 : ढोल-ताशाच्या गजरात गणेश विसर्जन

अर्ज विक्री-स्वीकृतीस मुदतवाढ दिल्याने आणि पुनर्विकासाअंतर्गत उपलब्ध झालेल्या घरांच्या किंमती कमी केल्याने अखेर सोडतीला प्रतिसाद मिळू लागला आहे. बुधवारी दुपारी १२ वाजेपर्यंत २०३० घरांसाठी एक लाख ४ हजार ३०३ जणांनी अर्ज भरले. यापैकी ७९ हजार ९८३ इच्छुक अर्जदारांनी अनामत रक्कमेसह अर्ज सादर केले आहेत. हा प्रतिसाद समाधानकारक आहे. मागील वर्षी सोडतीत ४०८२ घरांचा समावेश होता. यासाठी एक लाख ४५ अर्जांची विक्री झाली होती. यापैकी अंदाजे एक लाख २० हजार पात्र अर्जदार सोडतीत सहभागी झाले होते. यंदा मात्र २०२३ च्या तुलनेत ५० टक्क्यांनी घरे कमी असतानाही सोडतीला चांगला प्रतिसाद मिळत असल्याची माहिती मुंबई मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. अर्ज स्वीकृती एक लाखांचा टप्पा पार करेल. तर एक लाखांहून अधिक पात्र अर्जदार सोडतीत सहभागी होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. अर्ज स्वीकृतीची मुदत शुक्रवारी रात्री १२ वाजता संपुष्टात येत असून पात्र अर्जदारांची अंतिम यादी ३ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Good response to application sale acceptance of 2030 house lottery of mumbai board of mhada mumbai print news mrj