लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागण्याआधीच एकत्र ताकद दाखवावी, अशी तयारी करण्याचा निर्णय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्या बैठकीत मंगळवारी घेण्यात आला. भाजप-शिवसेना संवादाचे नवे पर्व सुरु करण्यात येणार असून एकत्रितपणे कार्यक्रम हाती घेतले जाणार आहेत.
फडणवीस प्रदेशाध्यक्ष झाल्याने त्यांनी मंगळवारी ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली. त्यानिमित्ताने विविध विषयांवर चर्चा झाली. १९९४ च्या निवडणुकांच्या वेळी ज्येष्ठ नेते प्रमोद महाजन यांनी पुढाकार घेऊन एकत्रितपणे काम केले होते. त्याचा परिणाम  १९९५ मध्ये युतीची सत्ता राज्यात आली.
सत्तास्थापनेसाठी आता योग्य संधी असून काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या कारभाराला जनता कंटाळली आहे. त्याचा फायदा उठविण्यासाठी एकत्र आंदोलने, मेळावे व अन्य कार्यक्रम घेऊन जनविरोध संघटित करावा, या मुद्दय़ावर दोन्ही नेत्यांचे एकमत झाले.