भारतातील धवलक्रांतीचे पितामह डॉ. वर्गीस कुरियन यांच्या ९४व्या जयंतीनिमित्त गुरूवारी गुगलकडून एका खास डुडलद्वारे त्यांना मानवंदना देण्यात आली. भारताला दुग्ध उत्पादनात अग्रेसर बनविण्यात कुरियन यांचा महत्त्वपूर्ण वाटा आहे. गुगलकडून बनविण्यात आलेल्या डुडलमध्ये डॉ. कुरियन एका स्टुलावर बसलेले दिसत आहेत. त्यांच्या बाजुला दूध काढण्यासाठी वापरण्यात येणारे कॅन आणि गाई दिसत आहेत. याशिवाय, या डुडलमध्ये कुरियन आणि त्यांच्या बाजुला उभ्या असणाऱ्या गायीच्या पायाशी एक दोर पडलेला दिसत आहे. या दोराच्या सहाय्यानेच गुगलचा लोगो कलात्मकरित्या साकारण्यात आला आहे.
दूध उत्पादनात तूट असलेला देश ते जगातील सर्वाधिक दूध उत्पादन करणारा देश हे भारताचे स्थित्यंतर घडवून आणण्यात वर्गीस कुरियन यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. डॉ. कुरियन यांच्या नेतृत्वाखाली “एनडीडीबी’ने “ऑपरेशन फ्लड’ (धवल क्रांती) सुरू केले आणि अवघ्या चार दशकांतच भारत हा जगातील सर्वाधिक दूध उत्पादन करणारा देश बनला. कुरियन यांनी गुजरात सहकारी दुग्ध पणन महासंघाची (जीसीएमएमएफ) स्थापना केली. २००७ पर्यंत सलग ३४ वर्षे ते या महासंघाच्या अध्यक्षपदी होते. ही संस्था “अमूल’ डेअरी उत्पादनांची निर्मिती करते. सारे जग गाईच्या दुधापासून बनवलेली भुकटी वापरत होते; तर भारतात विशेषतः उत्तर व मध्य भारतात म्हशी पालनाचे प्रमाण मोठे आहे. ही बाब जाणून डॉ. कुरियन यांनी म्हशीच्या दुधाची भुकटी तयार करण्याची किमया साधली. यामुळे भारतात दूध प्रक्रिया क्षेत्रात क्रांती झाली. यामुळे जगात अग्रेसर असलेल्या “नेस्ले’ कंपनीला “अमूल’ टक्कर देऊ शकली.

Story img Loader