माहिती-तंत्रज्ञान आणि संगणकाच्या सध्याच्या युगात ‘गुगल’ हे संकेतस्थळ अर्थात सर्च इंजिन आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे. आपल्या दैनंदिन जीवनातील अनेक गोष्टी ‘गुगल’ने जी मेल, यू टय़ूब, पिकासा, नकाशे, ऑर्कुट आणि इतर बऱ्याच काही सुविधांमुळे सोप्या करून टाकल्या आहेत. याच ‘गुगल’ने आता ‘गुगल ट्रान्सलेट’वर मराठी भाषा उपलब्ध करून दिल्यामुळे मराठी भाषा आता ‘विश्वात्मके’ झाली आहे.
‘गुगल ट्रान्सलेट’वर आत्तापर्यंत भारतीय प्रादेशिक भाषांमधील हिंदूी, गुजराथी, कन्नड, तमिळ, तेलुगू, बंगाली आणि ऊर्दू या भाषांच्या भाषांतराची सुविधा उपलब्ध होती. पण जगात सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांमध्ये १३ व्या क्रमांकावर असणाऱ्या आणि जगातील सुमारे तेरा कोटी लोक जी भाषा बोलतात, त्या मराठी भाषेला ‘गुगल ट्रान्सलेट’वर स्थान नव्हते. ‘गुगल’ने आता ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
सध्या या सेवेत एखाद्या मोठय़ा इंग्रजी परिच्छेदाचे तितके योग्य मराठी भाषांतर होत नसले तरीही इंग्रजीतील how are youचे तुम्ही कसे आहात, i want to go चे मी जाऊ इच्छित असे होत आहे. (इच्छिते/इच्छितो असे होत नाही) अशा प्रकारची छोटी छोटी वाक्ये मूळ इंग्रजीतून टंकलिखित केली की ती मराठीत भाषांतरित होत आहेत. ज्या परदेशी लोकांना किंवा आपल्या येथील गुजराती, कन्नड, तमिळ, तेलुगू लोकांना मराठी शिकायचे आहे, त्यांच्यासाठी ही खूप चांगली सोय आता उपलब्ध झाली आहे. मराठी भाषेबरोबरच ‘गुगल’ने बोन्सियन, फिलिपाइन्समध्ये बोलली जाणारी सेब्युनो, इंडोनेशियामध्ये बोलल्या जाणाऱ्या जावनीज् आदी भाषांचाही समावेश केला आहे. सध्या ही भाषांतर सेवा ६४ भाषांमध्ये उपलब्ध आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘गुगल’ला मराठीचे वावडे का?
‘लोकसत्ता’मध्ये २० जुलै २०११ च्या अंकात  भरत गोठोसकर यांनी लिहिलेला ‘गुगलला मराठी भाषेचे वावडे का?’ हा लेख प्रसिद्ध झाला होता. त्या लेखात गोठोसकर यांनी याच विषयाचा सविस्तर उहापोह केला होता. तसेच http://www.petitiononline.com/gmarathi  येथे स्वाक्षरी करून प्रत्येक मराठी माणसाने आपली नाराजी ‘गुगल’चे प्रमुख लॅरी पेज यांच्याकडे व्यक्त करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली होती.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Google language facility increase the importance of marathi language