पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीच्या पार्श्वभूमीवर गुगलकडून त्यांच्या स्वागतासाठी खास डुडल तयार करण्यात आले आहे. नरेंद्र मोदींचे गुगलमध्ये स्वागत आहे, असा संदेश गुगलच्या होमपेजवर झळकत आहे. या संदेशाच्या बाजुलाच भारतीय संस्कृतीचे प्रतिक असणाऱ्या फुलांचे तोरणही लावण्यात आले आहे. सिलिकॉन व्हॅलीत माउंटन व्ह्यू आणि फ्रेमॉंट येथे असलेल्या गुगलच्या कॅम्पसला मोदी भेट देणार आहेत.
तत्पूर्वी मोदींनी रविवारी सिलीकॉन व्हॅलीतील टॉप आयटी कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. यामध्ये गुगलचे सुंदर पिचई, मायक्रोसॉफ्टचे सत्या नडेला, क्यालकॉमचे पॉल जेकब, एडॉबचे शंतनु नारायण यांचा समावेश होता. यावेळी मोदींनी कंपनी प्रमुखांसमोर ‘डिजीटल इंडिया’ या योजनेची संकल्पना त्यांच्यापुढे मांडली.
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी काही दिवसांपूर्वीच यू-ट्युबवरील व्हिडिओच्या माध्यमातून मोदींचे अमेरिकेत स्वागत केले होते. बऱ्याच काळापासून भारत परदेशातील तंत्रज्ञान कंपन्यांची कुशल मनुष्यबळाची गरज पुरवत आला आहे. परंतु, सध्या भारतातही अंतर्गत क्रांती सुरू असून त्याचा १२१ कोटी भारतीय जनतेला फायदा होणार असल्याचे पिचाई यांनी व्हिडिओत म्हटले होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Google welcoming pm narendra modi through doodle