विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकासआघाडी आणि भाजपाच्या नेत्यांमध्ये जोरदार शाब्दिक युद्ध सुरू आहे. दोन्ही बाजूने वेगवेगळे दावे केले जात आहेत. भाजपामधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेले एकनाथ खडसे यांनी भाजपाचे अनेक आमदार आपल्या संपर्कात असल्याचा दावा केला. यावर आता भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी प्रतिक्रिया दिलीय. यात त्यांनी १७० आमदार असणारे पहाटेपर्यंत जागे का जागे होते? असा सवाल केला. ते सोमवारी (२० जून) विधीमंडळात मतदानानंतर पत्रकारांशी बोलत होते.
गोपीचंद पडळकर म्हणाले, “१७० आमदार असणाऱ्यांची बैठक पहाटे संपल्याचं माध्यमातून ऐकलं. भाजपाची बैठक रात्री साडेआठ वाजताच संपली. १७० आमदार असणारे पहाटेपर्यंत कशासाठी जागे आहेत? म्हणजे महाराष्ट्राच्या जनतेच्या लक्षात येतंय की त्यांच्यात काहीतरी गोंधळ उडाला आहे.”
“आज कुणीही पावसात भिजलं तरी निकालावर परिणाम होणार नाही”
गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांचं नाव न घेता त्यांनाही टोला लगावला. ते म्हणाले, “विधान परिषद निवडणुकीत भाजपाचे सर्व पाच उमेदवार निवडून येणार आहेत. आज कुणीही पावसात भिजलं तरी त्याचा निवडणुकीवर काही परिणाम होणार नाही.”
“राज्यात २०१९ च्या विश्वासघातानंतर पहिल्यांदा आमदारांना मत व्यक्त करण्याची योग्य संधी”
“भाजपा लोकशाहीवर विश्वास ठेवणारा पक्ष आहे. त्यामुळे या राज्यात २०१९ चा जो विश्वासघात झाला, जनतेने दिलेल्या कौलाच्या पाठीत खंजीर खुपसून सरकार स्थापन करण्यात आलं. परंतू आमदारांना पहिल्यांदा त्यांचं मत व्यक्त करण्याची योग्य संधी आली आहे,” असं मत गोपीचंद पडळकर यांनी व्यक्त केलं.
“लोकांनी युतीचं सरकार येण्यासाठी १६१ आमदार युतीचे निवडून दिले होते”
गोपीचंद पडळकर पुढे म्हणाले, “ज्या लोकांमधून हे आमदार निवडून आले आहेत त्या लोकांनी युतीचं सरकार येण्यासाठी १६१ आमदार युतीचे निवडून दिले होते. त्यामुळे आज हे सर्व आमदार मतदानातून व्यक्त होतील.”
हेही वाचा : “अशा लोकांना मी विकृत राजकीय…”, रुपाली पाटलांची गोपीचंद पडळकरांवर जहरी टीका
“अपक्ष आमदारांची मविआने अनेकदा अब्रू घालवली”
“अपक्ष आमदारांची मविआने अनेकदा अब्रू घालवली. ते लोकांमधून निवडून आले आहेत. त्यांच्या विश्वासार्हतेवर यांनी प्रश्नचिन्ह निर्माण केले. लोकांमध्ये या आमदारांविषयी मत कलुषित करण्याचा प्रयत्न झाला आहे. ते सर्व आमदार आजच्या दिवशी मतदानातून नक्कीच व्यक्त होतील,” असंही पडळकरांनी नमूद केलं.