खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकारांशी बोलताना राज्यातील विधीमंडळ हे चोरमंडळ आहे, अशा आशयाचं विधान केलं होतं. या विधानानंतर विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मोठा गदारोळ झाला. भाजपाच्या आमदारांनी संजय राऊतांवर हक्कभंगाची कारवाई करण्याची मागणी केली. राऊतांच्या या विधानानंतर विविध राजकीय प्रतिक्रिया उमटत असताना आमदार गोपीचंद पडळकर यांनीही यसंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा – VIDEO: “संजय राऊतांचं १० मिनिटं संरक्षण काढा, ते परत दिसणार नाही”, भर अधिवेशनात नितेश राणेंचं वक्तव्य
काय म्हणाले गोपीचंद पडळकर?
यासंदर्भात टीव्ही ९ वृत्तवाहिनीशी बोलताना, “विधिमंडळाबाबत अशा प्रकारे बोलणं हा लोकशाहीचा अपमान आहे. संजय राऊत हा पिसाळलेला माणूस आहे. त्यांनी संपूर्ण शिवसेनेची राखरांगोळी केली, तरीही त्यांचं समाधान झालेलं नाही. इतकं सगळं झाल्यानंतरही हा माणूस शांत बसत नाही. अशी वक्तव्य करून त्यांना नेमकं काय साध्य करायचं आहे, हे राऊतांनाच विचारलं पाहिजे”, अशी टीका गोपीचंद पडळकर यांनी केली.
“जनता राऊतांना योग्य वेळी उत्तर देईल”
“संजय राऊत हे रोज खालच्या स्तराला जाऊन वक्तव्य करतात. आज त्यांनी लोकशाहीचं पवित्र मंदिर असलेल्या विधिमंडळाबाबत चुकीचं विधान केलं आहे. महाराष्ट्रातील जनता त्यांना योग्य वेळी उत्तर देईल”, असेही ते म्हणाले.
हक्कभंगाची कारवाई करण्याची भाजपाची मागणी
भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी संजय राऊतांविरोधात हक्कभंगांची कारवाई करण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात त्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना पत्र दिलं आहे. “संजय राऊत यांनी विधिमंडळाचा अपमान करणारे उद्गार काढले आहेत. त्यांनी विधिमंडळाला थेट चोरमंडळ म्हटलं आहे. त्यामुळे राऊतांविरोधात हक्कभंगाची कारवाई करण्यासंदर्भात मी पत्र दिलं आहे”, अशी प्रतिक्रिया भातखळकर यांनी दिली.