ज्येष्ठ भाजप नेते खासदार गोपीनाथ मुंडे राज्यात सक्रिय झाले असून दुष्काळी भागाचा ते दौरा करीत आहेत. तेथील प्रत्यक्ष परिस्थिती जाणून घेण्यासाठी आष्टी तालुक्यातील एका गावात २ एप्रिलला गुरांच्या छावणीवर मुक्कामही ठोकणार आहे आणि भाजपतर्फे एक हजार गावांमध्ये पाण्याच्या टाक्या बसविल्या जाणार असल्याचे मुंडे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथसिंह पुढील आठवडय़ात राज्याच्या दुष्काळी भागाचा दौरा करणार आहेत.
प्रदेशाध्यक्ष नियुक्तीच्या मुद्दय़ावरून मुंडे व माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांच्यातील संघर्ष शिगेला गेला होता. गडकरी यांनी शिफारस केलेल्या सुधीर मुनगंटीवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याचे संकेत मिळाल्याने मुंडे नाराज होते. राज्यात फारसे लक्ष न देण्याची भूमिका त्यांनी घेतली होती. त्यामुळे अजून प्रदेशाध्यक्षांची घोषणा होऊ शकलेली नाही, पण मुंडे आता दुष्काळी भागाच्या दौऱ्यावर असून राज्यातील राजकारणात पुन्हा सक्रिय होण्याची चिन्हे आहेत. मुंडे सध्या ओलेवाडी (ता. केज) परिसरात असून जलसंधारण योजना, रोजगार हमीची कामे, गुरांच्या छावण्यांमधील परिस्थिती पाहात आहेत. गुरांच्या छावण्यांसाठी अनुदान मिळत नाही, रोजगार हमीची कामे मिळत नाही, अशी लोकांची तक्रार असल्याची माहिती मुंडे यांनी दिली.
दुष्काळी भागात सरकारी उपाययोजना अतिशय अपुऱ्या असून समस्यांची दाद लागत नाही. त्यामुळे आता गुरांच्या छावणीवर मुक्कामही ठोकून लोकांच्या समस्यांवर चर्चा करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. भाजपतर्फे मराठवाडय़ातील एक हजार दुष्काळी गावात प्लॅस्टिकच्या मोठय़ा साठवण टाक्यांचे वाटप करण्यात येणार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा