ज्येष्ठ भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी ‘सोशल इंजिनिअरिंग’ सुरू केले असून १९९५ च्या धर्तीवर ‘माधव’ (माळी, धनगर, वंजारी) चा प्रयोग आगामी निवडणुकीसाठी सुरू केला आहे. त्यासाठी अहिल्याबाई होळकर यांच्या कर्जत (जि. नगर) तालुक्यातील चौंडे गावी ३१ मे रोजी धनगरांचा राज्यस्तरीय मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
राज्यातील मुंडे यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढविण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे. मुंडे यांनी त्यादृष्टीने काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस विरोधी पक्ष, गट व नेत्यांना एकत्र आणण्यास सुरुवात केली आहे. त्याचबरोबर ओबीसींमधील महत्वाच्या माळी, धनगर, वंजारी समाजातील लोकांना आपल्याबरोबर आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले  आहेत.
नाशिक येथे वंजारींचा मेळावा झाल्यावर आता चौंडे येथे धनगरांचा मेळावा होणार आहे. राष्ट्रीय समाजवादी पक्षाचे महादेवराव जानकर, शेकापचे जयंत पाटील आणि रिपब्लिकन नेते रामदास आठवले आदी त्यास उपस्थित राहणार आहेत.
प्रदेशाध्यक्षपदी फडणवीस यांच्यासारख्या ब्राह्मण समाजातील नेत्याची निवड करण्यासाठी मुंडे यांनी आग्रह धरला होता. त्यानंतर आता मागासवर्गीयांमधील विविध जाती-जमातींना युतीकडे वळविण्यासाठी मुंडेंनी प्रयत्न सुरु केले आहेत. त्यांनी १९९५ च्या निवडणुकीआधी ‘माधव’ चा प्रयोग करून ओबीसींना युतीच्या बाजूने वळविण्याचा प्रयत्न केला होता आणि युतीला सत्ता मिळाली होती. हाच प्रयोग पुन्हा करून आगामी निवडणुकाजिंकण्यासाठी मुंडे यांनी आघाडी उघडली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gopinath munde started social engineering
Show comments