गोपीनाथ मुंडे यांच्या विरोधात बंड पुकारून दीड वर्षांपूर्वीच राष्ट्रवादीशी घरोबा केलेल्या धनंजय मुंडे यांनी मंगळवारी भाजपची आमदारकी सोडून अधिकृतपणे राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला.
न्यायालयीन अडसर दूर झाल्याने आणि लोकसभा निवडणूकीच्या पाश्र्वभूमीवर धनंजय मुंडे यांना अधिकृतपणे दाखल करून घेण्याचा निर्णय पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत सोमवारी बैठकीत घेण्यात आला. धनंजय यांनी विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा सभापती शिवाजीराव देशमुख यांच्याकडे सादर केला. धनंजय यांना पोटनिवडणुकीत निवडून आणले जाईल, असे संकेत आहेत.
गोपीनाथ मुंडे यांनी कन्येला राजकीय वारस म्हणून पुढे आणल्याने धनंजय नाराज होते. त्यांची ही नाराजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हेरली आणि त्यांना राष्ट्रवादीच्या कळपात आणले. गेली दीड वर्षे आमदार धनंजय मुंडे मनाने राष्ट्रवादीबरोबर तर तांत्रिकदृष्टय़ा ते भाजपमध्ये होते.
धनंजय यांना आता गोपीनाथ मुंडे अथवा पंकजा यांच्याविरोधात निवडणुकीत उभे करण्याबाबत राष्ट्रवादीत विचार सुरू आहे. राष्ट्रवादीचे नेते सांगतील ती निवडणूक आपण लढवू, असे धनंजय यांनी यावेळी जाहीर केले.
‘त्या व्यवहारात नव्हतो’ : आठ कोटी रुपये खर्च केल्याची कबुली दिल्याने गोपीनाथ मुंडे यांना निवडणूक आयोगाने नोटीस बजाविली आहे. त्या निवडणुकीची सारी सूत्रे धनंजय मुंडे यांच्याकडे होती. या निवडणूक खर्चाबाबत विचारले असता आपल्याला त्या खर्चाचे काही माहित नाही, त्या व्यवहारातच नव्हतो, असे सांगून काकांना अडचणीत आणण्याचे धनंजय यांनी टाळले.

Story img Loader