मुंबई : मध्य रेल्वेवरील कसाऱ्याच्या दिशेला जाणाऱ्या मार्गावर मंगळवारी गोरखपूर एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड झाला. परिणामी, सकाळपासून मध्य रेल्वेवरील अप आणि डाऊन मार्गावरील लोकल २० ते २५ मिनिटे विलंबाने धावत आहेत. तसेच मुसळधार पावसामुळे पश्चिम रेल्वेवरील लोकल १० ते १५ मिनिटे उशिराने धावत आहेत.
गाडी क्रमांक २०१०३ एलटीटी-गोरखपूर एक्सप्रेसच्या इंजिनमध्ये मंगळवारी सकाळी ८ च्या सुमारास बिघाड झाला. त्यामुळे एलटीटी-गोरखपूर एक्सप्रेस आसनगाव – आठगाव रेल्वे स्थानकांदरम्यान थांबली. परिणामी, कसाऱ्याच्या दिशेला जाणारी लोकल सेवा विस्कळीत झाली. कसाऱ्यापर्यंत धावणाऱ्या अनेक लोकल आसनगाव स्थानकातच रद्द करण्यात आल्या. तसेच, सीएसएमटीच्या दिशेला जाणाऱ्या लोकल विलंबाने धावत आहेत.
सीएसएमटीला जाणाऱ्या प्रवाशांसाठी जनता एक्स्प्रेसला कसारा – कल्याणपर्यंत सर्वच स्थानकांवर थांबा देण्यात आला. दरम्यान, पर्यायी इंजिन पाठवून एक्स्प्रेस मार्गस्थ करण्यात येत आहे, असे मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, मुंबईत मुसळधार पाऊस कोसळत असल्यामुळे पश्चिम, मध्य, हार्बर मार्गावरील लोकल विलंबाने धावत आहेत.