‘दहिसर – गुंदवली मेट्रो ७’ मार्गिकेतील गोरेगाव पूर्व मेट्रो स्थानक राम मंदिर रेल्वे स्थानकाशी पादचारीपुलाने जोडण्यात येणार आहे. गोरेगाव मेट्रो स्थानक आणि राम मंदिर रेल्वे स्थानकादरम्यान पादचारीपूल बांधण्यासाठी कंत्राटदाराची नियुक्ती करण्यात आली आहे. लवकरच या पुलाच्या कामाला सुरुवात करण्यात येणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>>VIDEO: “बच गया, नही तो मर जाता”, धक्काबुक्कीच्यावेळी काय घडलं? स्वतः सोनू निगमनेच सांगितलं, म्हणाला…

प्रवाशांच्या सोयीसाठी मेट्रो स्थानके रेल्वे स्थानकाशी जोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार ‘मेट्रो ७’ मार्गिकेतील गोरेगाव मेट्रो स्थानक आणि राम मंदिर रेल्वे स्थानक पादचारीपुलाने जोडण्यात येणार आहे. या कामासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) ऑक्टोबर २०२२ मध्ये निविदा मागविल्या होत्या. या कामासाठी तीन निविदा सादर झाल्या होत्या. त्यापैकी एक निविदा अंतिम करून त्यास मंजुरी देण्यात आली आहे. गुरुवारी झालेल्या प्राधिकरणाच्या कार्यकारी समितीच्या बैठकीत कंत्राटदाराच्या नियुक्तीला मंजुरी देण्यात आली आहे.

हेही वाचा >>>VIDEO : मुंबईतील संगीत कार्यक्रमादरम्यान गायक सोनू निगमला धक्काबुक्की; रुग्णालयात दाखल

मे. नीरज स्ट्रक्चरल्स लिमिटेड आणि मे. फोर्स कन्स्ट्रक्शन प्रा. लिमिटेड (संयुक्त उपक्रम) या कंपन्यांची पादचारीपूलाच्या बांधणीसाठी नियुक्ती करण्यात आली आहे. तब्बल २१० कोटी रुपये खर्च करून हा पादचारीपूल बांधण्यात येणार आहे. निविदा अंतिम झाल्याने लवकरच कामास सुरुवात होण्याची शक्यता आहे. हा पूल सुरू झाल्यास प्रवाशांची मोठी सोय होणार आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Goregaon metro station will be connected to ram mandir railway station by a footbridge amy