मुंबई : मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या महत्त्वाकांक्षी गोरेगाव – मुलुंड जोड रस्ता प्रकल्पाअंतर्गत (तिसरा टप्पा) संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून जाणाऱ्या जुळा बोगद्याच्या कामाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शनिवार, १३ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता करण्यात येणार आहे. गोरेगाव येथील नेस्को एक्झिबिशन सेंटरमध्ये आयोजित समारंभात या जुळ्या बोगद्यांचे भूमीपूजन करण्यात येणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई महापालिकेने पूर्व आणि पश्चिम उपनगरांना रस्ते मार्गाने जोडण्यासाठी महत्त्वाकांक्षी गोरेगाव – मुलुंड जोड रस्ता प्रकल्पाचे (जीएमएलआर) काम हाती घेतले आहे. सुमारे १२. २० किलोमीटर लांबीच्या या संपूर्ण प्रकल्पामुळे पूर्व आणि पश्चिम उपनगरांदरम्यान प्रवासाची वेळ ७५ मिनिटांवरून २५ मिनिटांवर येईल. या प्रकल्पाच्या तिसऱ्या टप्प्यांतर्गत संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून प्रत्येकी ४.७ किलोमीटर लांबीच्या जुळा बोगद्याची निर्मिती केली जाणार आहे. या जुळा बोगदा प्रकल्पाचे भूमिपूजन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शनिवार, १३ जुलै २०२४ रोजी करण्यात येणार आहे. गोरेगाव येथील नेस्को एक्झिबिशन सेंटरमध्ये सायंकाळी ५ वाजता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान राज्यपाल रमेश बैस भूषविणार आहेत. या समारंभास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल, केंद्रीय आयुष (स्वतंत्र कार्यभार) आणि आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव, केंद्रीय सामाजिक न्याय आणि हक्क राज्यमंत्री रामदास आठवले, केंद्रीय युवा कार्य आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे, केंद्रीय सहकार आणि नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार उपस्थित राहणार आहेत.

हेही वाचा – मुंबई : प्रशासक नेमण्याच्या कारवाईपासून पेंढारकर महाविद्यालयाला तूर्त दिलासा

विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, महाराष्ट्राचे शालेय शिक्षण, मराठी भाषा मंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, कौशल्य विकास, उद्योजकता व नाविन्यता मंत्री तथा मुंबई उपनगरे जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री रवींद्र चव्हाण या समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

हेही वाचा – महिलेच्या पोटातून काढली पावणेपाच किलोची गाठ, कामा रुग्णालयातील डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून दिले जीवदान

जुळा बोगदा प्रकल्पाविषयी माहिती

• गोरेगाव – मुलुंड जोड रस्ता प्रकल्पाअंतर्गत (तिसरा टप्पा) बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून प्रत्येकी ४.७ किलोमीटर लांब आणि ४५.७० मीटर रुंदीचा जुळा बोगदा.

• जोड मार्ग आणि अन्य बाबींसह तिसऱ्या टप्प्यातील मार्गाची एकूण लांबी ६.६५ किलोमीटर.

• हा जुळा बोगदा जमिनीखाली २० ते १६० मीटर खोलीवर असेल.

• प्रत्येकी ३०० मीटर अंतरावर दोन्ही बोगदे एकमेकांशी जोडले जातील.

• सुमारे १४.२ मीटर व्यासाच्या बोगदा खोदण्याच्या संयंत्राने (टीबीएम) होणार बोगद्याचे खोदकाम.

• बोगद्यामध्ये अत्याधुनिक प्रकाशव्यवस्था, वायुविजन प्रणाली, अग्निरोधक यंत्रणा, सीसी टीव्ही कॅमेरे, बोगद्याच्या दोन्ही दिशांना नियंत्रण कक्ष आदी सुविधांचा समावेश.

• पर्जन्य जलवाहिनी, भविष्यातील पाणीपुरवठ्यासाठी लागणाऱ्या संभाव्य जलवाहिन्या आदी उपयोगिता वाहिन्यांची बोगद्याच्या खाली व्यवस्था.

• संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील वनस्पती, प्राणी तसेच आरे, विहार व तुळशी तलाव यांचे क्षेत्र बाधित न करता आणि त्यांना हानी न पोहोचवता बोगद्याचे बांधकाम होणार.

• प्रकल्पासाठी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये भूसंपादन करण्यात आलेले नाही.

• जुळा बोगद्याच्या निर्मितीसाठी ६३०१.०८ कोटी रुपये खर्च अपेक्षित.

• जुळा बोगद्याचे काम पूर्णत्वास येण्याचा अंदाजित कालावधी ऑक्टोबर २०२८ पर्यंत

• प्रकल्पाची सद्यस्थिती: एकूण स्टेशन सर्वेक्षण, माती तपासणीची कामे, तात्पुरते रस्ते वळविण्याचे काम तसेच प्राथमिक संरेखन (डिझाइन) कार्य प्रगतिपथावर.

• बोगदा प्रकल्पामुळे विस्थापित होणाऱ्या निवासी आणि व्यावसायिक प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाकरीता २३ मजल्यांच्या ७ इमारती आणि तळमजला ३ मजल्यांची बाजार इमारतीची कामे प्रगतिपथावर.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Goregaon mulund link road project pm modi will do bhoomipujan of twin tunnels tomorrow mumbai print news ssb