मुंबई : गोरेगाव – मुलुंड जोडरस्ता प्रकल्पांतर्गत दादासाहेब फाळके चित्रनगरी येथे जुळे बोगदे खोदण्यात येणार आहे. या भुयाराच्या खोदकामासाठी टनेल बोअरिंग सयंत्र (टीबीएम) ऑगस्ट महिन्यात दाखल होणार आहे. हे टीबीएम संयंत्र ठेवण्यासाठी भूखंड उपलब्ध करून द्यावा, अशी विनंती मुंबई महापालिका प्रशासनाने चित्रनगरी व्यवस्थापनाकडे केली आहे.

मुंबई महानगरपालिकेने पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडण्यासाठी सुमारे १२.२० किलोमीटर लांबीचा गोरेगाव – मुलुंड जोडरस्ता हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पांतर्गत पश्चिम उपनगरातील गोरेगावमधील दादासाहेब फाळके चित्रनगरीपासून पूर्व उपनगरातील मुलुंडमधील खिंडीपाडापर्यंत जुळा व भूमिगत बोगदा बांधण्यात येणार आहे. एकमेकांना समांतर असे प्रत्येकी ४.७० किलोमीटर लांबीचे हे जुळे बोगदे असतील. हा बोगदा संजय गांधी राष्ट्रीय अभयारण्याच्या डोंगराखालून जाणार आहे. या भूमिगत बोगद्यात शिरण्यासाठी चित्रनगरी परिसरात पेटी बोगदा बांधण्यात येणार आहे. या प्रकल्पाचे काम वेगाने सुरू आहे. प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील कामांची अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी पाहणी केली.

भुयारीकरणासाठी साधारण २०० मीटर (लांबी) बाय ३० मीटर (रूंद) बाय ३८ मीटर (खोली) च्या लॉन्चिंग शॉफ्टचे काम सुरू आहे. त्याच्या ‘पायलिंग’ कामाची पाहणी बांगर यांनी केली. भुयारीकरणासाठी टीबीएम सयंत्र ऑगस्ट महिन्यात दाखल होणार आहे. हे टीबीएम संयंत्र ठेवण्यासाठी चित्रनगरी व्यवस्थापन जोश मैदान, वेलकम मैदान, साई मैदान उपलब्ध करून देणार आहे. स्थानिक महानगरपालिका अधिकाऱ्यांनी मैदान उपलब्धतेसाठी चित्रनगरी व्यवस्थापनाकडे पाठपुरावा करावा, असे आदेश बांगर यांनी दिले. चित्रनगरीतील विद्यमान रस्त्यालगत पर्यायी रस्ता विकसित केला जात आहे, त्याची पाहणीदेखील बांगर यांनी केली.

गोरेगाव-मुलुंड जोड रस्ता प्रकल्पांतर्गत दिंडोशी – गोरेगाव – दादासाहेब फाळके चित्रनगरीदरम्यान सहा पदरी उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. त्याची उंची १२६५ मीटर आहे. उड्डाणपुलासाठी बॉक्स गर्डर व उच्चस्तरीय काँक्रीटचा वापर केला जात आहे. तसेच, रस्ता ओलांडण्यासाठी पादचारी पूल, स्वयंचलित सरकता जिन्याची सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे. रत्नागिरी जंक्शन येथे उड्डाणपुलाला आधार देणारे ४ उभे खांब (पिअर्स) वगळता उर्वरित काम अंतिम टप्प्यात आले आहे. गोरेगाव – मुलुंड जोडरस्ता प्रकल्पाअंतर्गत दिंडोशी – गोरेगाव – दादासाहेब फाळके चित्रनगरीदरम्यान उभारण्यात येणाऱ्या उड्डाणपुलाचे काम जलदगतीने पूर्ण करावे, अतिरिक्त मनुष्यबळाचा वापर करून तीन पाळ्यांमध्ये पुलीचे व अनुषंगिक कामे पूर्ण करावी, जेणेकरून पूल लवकरात लवकर वाहतुकीसाठी खुला होईल, असे आदेशही बांगर यांनी दिले.

Story img Loader